आदिवासी जनतेच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहू : आ.बाळासाहेब थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अकोले तालुका नेहेमीच पुरोगामी विचारांचा प्रभावाखाली राहिला असून राघोजी भांगरे यांच्यासारख्या क्रांतीविराच्या गावी येऊन त्यांना, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याचे भाग्य मला मिळाले असून

आपण सदैव आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळाचे प्रमुख आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या देवगाव या मूळ गावी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले कि, आदिवासी जनतेचा इंग्रजांच्या काळात झालेला छळ, अन्याय व अत्याचाराच्या विरोधात ज्या वीर क्रांतिकारांनी योगदान दिले,

त्यात राघोजी भांगरे यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. काँग्रेसच्या नेत्या व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी सातत्याने आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर पुढे येत त्यांना बळ दिले.

त्याचप्रमाणे आज फक्त देशात काँग्रेस पक्षच गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व आदिवासी बांधवांच्या पाठिशी ठामपणे उभे राहून देशातील जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी व आदिवासी भागातील अनेक

प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करत त्यांना वनवासी, असे न हिनवता जातीय शक्तींना इशारा देत आदिवासी हेच मूळ असल्याने आपण तालुक्यातील विविध प्रकारच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

तर निळवंडेचे लोकार्पण करताना श्रेय घेण्याच्या उद्देशाने ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचा सन्मान करण्याऐवजी स्वतःची पाठ थोपटून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेदना होईल, असे वर्तन त्यांनी केले आहे.

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मधुकर नवले यांनी वीर राघोजी भांगरे यांचा जीवनपट विस्ताराने मांडत उपस्थितांना हेलावून सोडले. केदार महाराज यांचे राघोजी भांगरे यांचे जीवनावर आधारित प्रवचन चर्चेचा विषय ठरले. महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते, आदिवासी युवा नेते अमित भांगरे, सतीश भांगरे आदींची समयोचित भाषणे झाली.

यावेळी जेष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, मिनानाथ पांडे, तालुका अध्यक्ष शिवाजी नेहे, मंदाताई नवले, मारूती मेंगाळ, संभाजी वाकचौरे, रमेश जगताप, एकनाथ सहाणे, मदन आंबरे, सतीश पाचपुते, शिवाजी चौधरी,

मुरलीधर शेणकर, रामदास धुमाळ, सचिन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजनीकांत भांगरे, तुकाराम म्हशाळ, संदीप दराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.