धनुष्यबाण आम्हालाच मिळणार; शंभूराजे देसाईंचा विश्वास

मुंबई : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावरुन मोठा वादंग सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना धनुष्याबाण असो अथवा इतर कोणतेही चिन्ह मिळाले तरी कंबर कसून हे चिन्ह घराघरात पोहचवण्याची तयारी ठेवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. यावरुन आता शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी चिन्हाबाबत वक्तव्य केले आहे.

आम्ही आधीपासून हे सांगतोय. ५५ पैकी ४० आमदारांनी शिवसेनेत उठाव केला आहे. हीच खरी शिवसेना आहे. दोन तृतियांशपेक्षा जास्त बहुमताने निवडून आलेले प्रतिनिधी म्हणाले की आपण महाविकास आघाडीत राहाणे चुकीचे आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना तशी विनंतीही केली होती. पण ते शक्य न झाल्यामुळे आम्ही उठाव केला. दोन तृतियांश लोकप्रतिनिधींनी उठाव केल्यामुळे आम्हीच मूळ शिवसेना आहोत. त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह हे आमचेच आहे, असे शंभूराजे देसाई म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जो उठाव केला आहे, ती आमची शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंनी हे जे वक्तव्य केलं आहे, त्याचा अर्थ आता त्यांनाही खात्री पटली आहे की आम्हीच मूळची शिवसेना आहोत. शिवसेनेचे चिन्ह आमच्याकडेच राहणार आहे. म्हणून ते असे म्हणाले असावे की दुसरे चिन्ह मिळाले तर ते लोकांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे मला खात्री आहे की धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हालाच मिळणार आहे, असा विश्वास शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला आहे.