राजकारण

Ahmednagar Politics : जे विखेंचे होऊ शकले नाही, ‘ते’ तनपुरेंचे होतील का ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : गेल्या २५ ते ३० वर्षांत विखे पाटील परिवार व विकास मंडळ यांनी सर्व काही भरभरून देऊनही जे विखे कुटुंबियांचे होऊ शकले नाही, ते पक्ष बदलून आता तरी तनपुरेंचे होतील का? असा सवाल करत कृषी उत्पन्न बाजार समिती व पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेशराव बानकर यांनी माजी संचालक भारत तारडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत बोलताना बानकर पत्रकात म्हणाले, राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील यांच्या मदतीने तारडे राजकारणात आले. पद्मभूषण माजी खा. बाळासाहेब विखे पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील व विकास मंडळाने त्यांना गेल्या २५ ते ३० वर्षांत कारखान्याचे संचालक केले.

त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अनेक ठिकाणी पदे दिली; मात्र इतकं काही देऊनही ते विखे परिवाराचे होऊ शकले नाहीत, तर ते काल परवा ज्यांच्याकडे गेले त्या तनपुरेंचे तरी होतील का? वास्तविक आपण भाजपचे पदाधिकारी म्हणून ताहाराबाद येथील ग्रामीण रुग्णालयाबाबत भूमिका मांडली होती.

यामध्ये इतर कोणत्याही कार्यकर्त्यांचे नाव घेतलेले नव्हते. यांना गावात अवघ्या १२०० सभासद असलेल्या सेवा संस्थेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. उलट आम्ही गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या कायम सोबत आहोत.

त्यामुळे बाजार समिती, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सेवा संस्था आदी ठिकाणी काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. तंटामुक्त समिती अध्यक्षपदाच्या काळात गावात एकोपा निर्माण होण्यासाठी काम केले. सामाजिक जीवनात काम करत असताना गेल्या १० वर्षापासून सातत्याने वेळ देत होतो.

लोकांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास असल्याने गावाने मला संधी दिली. याउलट यांनी गावातील किती लोकांचे वाद मिटवले की पेटवले, कोणते प्रश्न सोडवले की वाढवले, याचे आत्मपरीक्षण करावे.

कारखान्याचे संचालक असताना आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले की त्यांना वेठीस धरले, याचे आत्मपरीक्षण यांनी स्वतःच करावे, असा सल्ला बानकर यांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office