आमदार निलेश लंकेंची निवडणुकीसाठी माघार ? महायुतीच्या मेळाव्यापासून दूर, अर्धांगिनीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगतेपासूनही राहिले लांब वाचा नक्की काय घडलं ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : Ahmednagar Politics : लोकसभेची निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे तसे-तसे अहमदनगरच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. इकडे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा पार पडला आहे. तर दुसरीकडे नगर दक्षिण मधून लोकसभा लढवण्याचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्या अर्धांगिनी राणी लंके यांनी देखील घाईगडबडीत शिवस्वराज्य यात्रेची सांगता केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. जिल्ह्यात अजित पवार गटाकडे चार आमदार आहेत. मात्र असे असले तरी जिल्ह्यात महायुतीत फक्त आणि फक्त भाजपामधील विखे पिता-पुत्रांची चलती पाहायला मिळत आहे. दिल्ली दरबारी असणाऱ्या आपल्या वजनामुळे विखे पिता-पुत्र हे एक प्रकारचे पॉवर हाऊस म्हणून उदयास आले आहे. मात्र या पॉवर हाऊसला स्वपक्षातूनच घरचा आहेर देण्यात आला आहे. स्वपक्षीय माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि माजी आमदार तसेच वर्तमान विधानपरिषद आमदार राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्याविरोधात मोर्चा खोलला आहे.

आमदार शिंदे आणि कर्डिले यांनी महायुतीच्या मेळाव्यात स्वपपक्षीय विखे पाटलांना टोला लगावला आहे. आमदार शिंदे यांनी तर राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील विजयानंतर मुख्यमंत्री निवडीचा दाखला देत आगामी लोकसभेच्या उमेदवारी बाबत कोणीही गाफील राहू नये, संभ्रमात राहू नये असा गर्भित इशारा विखे पिता पुत्रांना दिला आहे. यामुळे मित्र पक्षांऐवजी स्वपक्षातच विखे-पिता पुत्रांचा अधिक विरोध पाहायला मिळत आहे.

कारण की, जिल्ह्यात अजित पवार गटाचे वर्चस्व असतानाही अजून तरी अजित पवार गटाकडून उघडपणे विखे पिता-पुत्रांचा विरोध होत नाहीये. मात्र दबक्या पावलांनी विरोधाची तयारी सुरू आहे एवढे नक्की. कारण की अजित पवार गटातील पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके हे महायुतीच्या मेळाव्यापासून कोसो दूर होते. मेळाव्याला लंके यांची अनुपस्थिती बरेच काही सांगू पाहत आहे. मात्र ही अनुपस्थिती नेमकं काय संकेत देत आहे हे अजून गुलदस्त्यात आहे. कारण की, लंके यांनी त्यांच्या अर्धांगिनी राणी लंके यांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगत्यापासूनही चार हात लांब राहण्यात समाधान मानले आहे.

विशेष म्हणजे नगर शहरात सांगता झाली आणि नगर शहरात हजर असतानाही ते त्यांच्या अर्धांगिनीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगत्याला गैरहजर राहिले. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. खरे तर आज अर्थातच 16 जानेवारी 2024 ला राणी लंके यांच्या शिवस्वराज्य यात्रेची नगर शहरात सांगता झाली. यावेळी सौ. लंके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. नगर शहरात निघालेल्या या यात्रेत लंके समर्थकांची हजेरी पाहायला मिळाली. आमदार लंके मात्र या यात्रेपासून दूर राहिले.

शहरात असूनही त्यांचे यात्रेला येणे जमले नाही हे विशेष. या यात्रेची विशेषता म्हणजे ही यात्रा नगर शहरातून न जाता भाजप महायुतीचे समन्वयक राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या दोन्ही कार्यालयासमोरून गेली. यामुळे राणी लंके आपल्या पतीच्या पक्षावरच तिकिटासाठी दबाव तर नाही ना बनवत ? हा देखील मोठा सवाल सध्या नगरच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. वास्तविक, राणी लंके यांनी काढलेली शिवस्वराज्य यात्रा फक्त तीन तालुके होताच आटोपली आहे.

यामुळे घाई गडबडीत यात्रा संपवण्याचे कारण काय असाही सवाल आहे. दुसरीकडे या यात्रेच्या सांगतेत राणी लंके यांनी आपण लोकसभा लढवणारच असा निर्धार पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे. ही यात्रा पाथर्डी येथील मोहटा देवीचे दर्शन घेऊन सुरू झाली. यात्रेची सुरुवात झाली तेव्हा राणी लंके यांनी मी स्वतः किंवा पती लोकसभा लढवणारच असे सांगितले आणि यात्रेची जल्लोषात सुरुवात झाली. दरम्यान ही यात्रा तीन तालुक्यात पोहोचली. अजित पवार गटातील काही नेत्यांनी आणि लंके समर्थकांनी या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.

विशेष म्हणजे या यात्रेत विखे विरोधकांचा अधिक सहभाग होता. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत होता मात्र आज या यात्रेची सांगता करण्यात आली. सांगता कार्यक्रमात राणी लंके यांचे पती आमदार लंके गैरजर राहिले. आमदार लंके शहरात असून या यात्रेच्या सांगतेसाठी आले नाहीत तसेच यात्रा लवकर आटोपली गेली यामुळे सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र राणी लंके यांनी या यात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आज या यात्रेवर तेरा जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली. राणी लंके आणि यात्रेत सहभागी झालेल्या अन्य लोकांनी शिवप्रभूंचे दर्शन घेतले, त्यांना अभिवादन केले आणि या यात्रेची सांगता केली.

दरम्यान ही यात्रा घाईगडबडीत का आटोपली गेली असा सवाल राणी लंके यांना प्रसार माध्यमांनी विचारला असता सौ लंके यांनी या प्रश्नाचे उत्तर देऊन बंद गुलदस्त्याला जाड दोरीने बांधून ठेवण्याचे काम केले आहे. यामुळे ही यात्रा घाईगडबडीत आटोपण्यामागे काहीतरी राजकीय गणित दडले असल्याचे बोलले जात आहे. लंके यांच्या समवेत एकतर महायुतीने वाटाघाटी केली असावी किंवा स्वपक्षातून लंके यांना काहीतरी ठोस आश्वासन मिळालेले असावे अशा चर्चा पाहायला मिळत आहेत. मात्र या चर्चा आहेत, याबाबत आमदार लंके आणि सौ राणी लंके यांच्याकडून कोणतीच अपडेट मिळालेली नाही. यामुळे जोपर्यंत नगर दक्षिणचा उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चा अशाच सुरू राहणार आहेत. यामुळे या चर्चा किती खऱ्या आणि किती खोट्या हा येणार काळच सांगणार आहे.