राजकारण

Ahmednagar Politics News : निरव मोदीने अहमदनगर जिल्ह्यात जमिनींची खरेदी कधी केली ? आ.रोहित पवार स्पष्टच बोलले…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics News : आमदार रोहित पवार हे अनेक दिवसांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीच्या मंजुरीसाठी प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पाठपुरावा करुन त्यांनी या एमआयडीसीला तत्वतः मंजुरी मिळवली.

त्यानंतर इतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्या. यासंदर्भातील उच्चाधिकार समितीनेही या एमआयडीसीला मंजुरी दिली असून याबाबत केवळ अधिसूचना काढून अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी एमआयडीसीचे हे भिजत घोंगडे पडले आहे. याबाबत सोमवार (२४ जुलै) त्यांनी विधानभवनाच्या आवारात उपोषण सुरु केले. त्यावर स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत याबाबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

परंतु मंत्री बैठकीसाठी आले नाहीत. प्रा. राम शिंदे यांनी विधानपरिदेत या विषयावर चर्चा करताना मतदारसंघात निरव मोदी यांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप केला. त्यावर आमदार रोहित पवार यांनी निरव मोदी आणि त्यांच्याशी संबंधित कंपनीने २०११ मध्येच संबंधित जमीन खरेदी केल्याचे सांगितले. तसेच त्या जमीन खरेदी चौकशी करावी असे देखील आव्हान त्यांनी दिले आहे.

मतदारसंघातील जनताही रस्त्यावर

एकीकडे एमआयडीसी’च्या विषयावर आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनात रान पेटवले असताना दुसरीकडे मतदारसंघातील जनताही त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे भविष्यात कर्जत- जामखेडच्या एमआयडीसीचा हा प्रश्न कोणत्या दिशेने जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जमिनींची खरेदी राम शिंदे आमदार असताना !

मतदारसंघातील ‘एमआयडीसी’चा प्रश्न आता राज्यात चांगलाच तापला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात निरव मोदी यांच्यासह अनेकांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे केला तर या जमिनींची खरेदी ही राम शिंदे आमदार असताना २०११ मध्येच झाल्याचा पलटवार आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच याबाबत चौकशी करण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे.

जनता त्यांचे मनसुबे पूर्ण होवू देणार नाही

“सलग दहा वर्षे आमदार, त्यातील पाच वर्षे कॅबिनेटमंत्री राहिलेल्या नेत्याला स्वतःच्या मतदारसंघात ‘एमआयडीसी’ आणता आली नाही.परंतु मी आमदार झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षात एमआयडीसीच्या कामाला वेग दिला आणि हा विषय आता अंतिम टप्प्यात असताना सरकार गेल्यामुळे केवळ अधिसूचनेसाठी प्रलंबित आहे. अधिसूचना निघाली तर आतापर्यंत एखादा मोठा प्रकल्पही या ठिकाणी सुरु झाला असता आणि त्याचं श्रेय मला मिळेल म्हणून प्रा. राम शिंदे हे सरकारवर दबाव आणून या विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे हे मनसुबे कर्जत-जामखेडची जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही. आम्ही सर्वजण मिळून हक्काची एमआयडीसी आणल्याशिवाय राहणार नाही. – रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

Ahmednagarlive24 Office