श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्यावर्षी आली होती तशीच रंगत यावर्षीही येथे दिसत आहे. काँग्रेसचे लहू कानडे हे येथून आमदार असले तरी, यावेळी त्यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातील इतरांचे आव्हान आहे. दुसरीकडे महायुतीकडून ही जागा परंपरागत शिवसेनेला मिळत असली तरी यंदा येथे भाजपनेही दावा केलाय. त्यामुळे कधी नव्हे एवढी रंगत या मतदारसंघात पहायला मिळत आहे. शिवाय माजी खासदार सदाशिव लोखंडे व विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मुलांनीही या मतदारसंघात चाचपणी सुरु केल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. मविआकडून कानडे की ओगले आणि महायुतीकडून दिनकर की उदमले याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
गेल्या विधानसभेला भाजप व शिवसेनेची शेवटच्या क्षणी युती झाली. मात्र जागावाटपापूर्वी भाजपने स्वबळाची तयारी केली होती. श्रीरामपूर विधानसभेची जागा जागावाटपात शिवसेनेला असली तरी, गेल्यावेळी भाजपनेही तेथील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. श्रीरामपूरमधून तेव्हा नितीन उदमले, अशोक वाकचौरे, अशोक कानडे, भाऊसाहेब वाकचौरे, सतीश सौदागर, चंद्रकांत काळोखे, डाँ. वसंत जमदाडे, श्रीकांत साठे, सागर रंधवे, प्रा. संतोष रंधवे, नितीन दिनकर, प्रकाश संसारे अशा भाजपच्या तब्बल 12 दिग्गजांनी मुलाखती दिल्या होता. मात्र पुढे भाजप-शिवसेनेची युती झाली, आणि ही जागा परंपरागत शिवसेनेकडे गेली. त्यामुळे मुलाखती दिलेल्या भाजपच्या इच्छुकांना शांत बसावं लागलं. यंदाही आरक्षित असलेल्या श्रीरामपूर मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे.
या मतदारसंघात काँग्रेसचा ससाणे गट व भाजपचा विखे गट या दोन्ही गटाची निर्णायक भूमिका राहते. लोकसभेला येथे विखे गटाने ससाणे गटावर मात केली. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले असले तरी, येथे शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडेंना जास्त मते मिळाली होती. लोखंडेंना येथून 86,545 तर वाकचौरेंना 74,960 मते मिळाली होती. लोखंडेंनी तब्बल 12 हजारांची आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेसचा विद्यमान आमदार असूनही महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली जास्त मते आ. कानडेंसाठी डोकेदुखी ठरणारी आहेत.
काँग्रेसची पिछेहाट होण्यास कानडेच जबाबदार आहेत, असा आरोप करत येथे काँग्रेसच्या एका गटाने देशपातळीवर काम करणाऱ्या हेमंत ओगलेंच्या तिकीटासाठी फिल्डींग लावली आहे. ससाणे गटही ओगलेंच्याच मागे आहे. त्यामुळे कानडेंना यंदा तिकीट मिळेल का, हा प्रश्न आहे.दुसरीकडे महायुतीकडूनही शिदेसेनेचे इच्छुक भाऊसाहेब कांबळे यांना तिकीट मिळेल का, हा प्रश्न आहे. लोकसभेपूर्वी कांबळेंनी शिंदेगटात प्रवेश केला त्यावेळी त्यांना विधानसभेचा शब्द देण्यात आल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र सलग दोन पराभवामुळे कांबळेंना तिकीट मिळेल का, ही शंका आहे. शिदेसेनेऐवजी ही जागा भाजपला सोडावी, अशीही चर्चा येथे आहे.
भाजपकडून नितीन दिनकर व नितीन उदमले हे दोन दिग्गज इच्छुक आहेत. नितीन दिनकरांना विखे गटाचा पाठींबा असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे येथून उदमले की दिनकर हा प्रश्न आहे. शिवाय मुरकुटे गटही या निवडणुकीत कोणामागे राहिल, हा प्रश्न आहे. मात्र मुरकुटेंचा गेल्या काही दिवसातला अनुभव पाहिला तर ते महायुतीच्या उमेदवारामागे ताकद उभी करतील, अशीच शक्यता आहे.हे सगळे पाहता, लहू कानडेंना ही निवडणूक नक्कीच सोपी नाही. तिकीट कुणाला मिळते, यावर या मतदारसंघात हारजीत ठरणार आहे,