Maharashtra Politics : महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री बदल होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच महायुती आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या जातील.
६ महिन्यांत फार काही बदलत नाही. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवण्याची संधी मिळेल, तेव्हा त्यांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत राज्यातील नेतृत्व बदलावरील चर्चेला पुन्हा एकदा पूर्णविराम दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चांवर भाष्य केले. ६ महिन्यांत अजित पवार मुख्यमंत्री बनतील, अशी चर्चा असल्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले,
६ महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायची संधी मिळेल तेव्हा आम्ही त्यांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू. सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील.
त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवल्या जातील. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार आहे, हे तुमच्या डोक्यातून काढून टाका, असेही फडणवीस म्हणाले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना शरद पवार यांनी केली होती. त्यांच्या सूचनेनंतरच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आल्याचा गौप्यस्फोटही फडणवीस यांनी यावेळी
ते पुढे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेमुळे सत्तेवर कोण येणार, असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी शरद पवार यांनी भाजपशी संपर्क साधला आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपने युती करावी, असे सुचवले.
त्यासाठी राज्यात काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. जेणेकरून राष्ट्रवादीतील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी वेळ मिळू शकेल. मात्र, सर्व वाटाघाटी झाल्यानंतर ऐनवेळी शरद पवार यांनी माघार घेतली, असा दावाही फडणवीस यांनी केला.