Radhakrishan Vikhe Patil On Sanjay Raut : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाविकास आघाडीमधील उबाठा शिवसेना गटातील नेते संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वार-पलटवार सुरू आहेत.
खरेतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘महानंद’ची गोरेगाव येथील 50 एकरची प्राइम लोकेशनची जमीन अदानीला विकण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे.
मात्र या आरोपावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच भडकले आहेत. त्यांनी संजय राऊत यांना थेट इशाराच दिला आहे. महसूलमंत्र्यांनी आज नगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील टंचाई बाबत आढावा बैठक घेतली होती.
यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान संजय राऊत यांच्या आरोपावर उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी “मी वारंवार सांगत आलेलो आहे खासदार राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
ती जी मुक्ताफळे उधळत आहेत, खरंतर त्यांना मानसोपचाराची गरज आहे. ती कोणत्या 50 एकर जमिनीचे आरोप करताहेत हे त्यांनाच माहिती आहे.” असे सांगितले आहे.
एवढेच नाही तर त्यांनी संजय राऊत यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पत्रकाराशी बोलताना म्हटले की, “मी आत्तापर्यंत पुष्कळ सहन केले. तसेच काही पथ्यंदेखील पाळतोय.
परंतु ते ‘महानंद’बाबत बेताल वक्तव्य करत असतील तर त्यांनी त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे. मी आता त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे.
तुम्ही ५० एकरचा दावा करत आहे, तो सिद्ध करावा सिद्ध न केल्यास त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल.”
‘ते’ पिसाळलेल्या कुत्र्यासारखे बोलतात….
उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपा मुंबई विकण्याच्या तयारीत असल्याचे सुद्धा म्हटले होते. यामुळे याबाबतही पत्रकारांनी महसूल मंत्री यांना प्रश्न विचारला होता. दरम्यान या प्रश्नावर उत्तर देताना महसूल मंत्री चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.
विखे पाटील म्हणाले की, ‘खासदार राऊत यांना लोकांनी गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी व्यक्तिगत जीवनात काय केले, कोणाचे घर फोडले, हे मलाही सांगावे लागणार आहे.
ते पिसाळलेल्या कुत्र्यासारखे बोलतात अशी उपमा वापरल्यास हे सर्वात जास्त वाईट होईल. त्यामुळे ही म्हणण्याची विरोधकांनी आमच्यावर वेळ आणू नये,’ असे बोलत विखे पाटील यांनी खासदार राऊत यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यामुळे आता विखे यांच्या या पलटवारावर राऊत हे काय बोलतात हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.