Ahmednagar Politics : अशोक साखर कारखान्याचे चेअरमन, लोकसेवा विकास आघाडीचे संस्थापक माजी आ. भानुदास मुरकुटे सध्या हैद्राबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे हैद्राबाद येथील मंत्रालयासमोरील छायाचित्रे सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली.
त्यामुळे मुरकुटे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची तेलंगणात राबविलेल्या शेतकरी योजनांची पाहणी करण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी माजी आ. मुरकुटे दौऱ्यावर गेले आहेत.
त्यांचे हैद्राबाद येथील मंत्रालयासमोरील तसेच भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबतची छायाचित्रे सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली. गंगापूरचे माजी आ. अण्णासाहेब माने, श्रीगोंद्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व नुकतेच बीआरएसमध्ये प्रवेश केलेले घनश्याम शेलार, अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर काळे यांच्यासह तेथील आमदार उपस्थित होते.
माजी आ. मुरकुटे यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. माजी आ. माने व घनश्याम शेलार यांच्या पुढाकाराने ही भेट घेण्यात आली. या भेटीमुळे मुरकुटे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे. मात्र सध्या तसे काही ठरले नाही, येथील सरकार शेतकऱ्यांसाठीच्या योजना कशा पद्धतीने राबविते या योजनांची पाहणी व माहिती घेण्यासाठीचा हा दौरा असल्याचे मुरकुटे यांनी स्पष्ट करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
माजी आ. मुरकुटे यांनी यापूर्वी वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी करत तीन वेळा आमदार म्हणून तालुक्याचे नेतृत्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्ती होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेप्रसंगी ते सर्वप्रथम पवार यांच्यासोबत होते.
नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी केली. त्यानंतर कोणत्याच पक्षात न राहता निवडणुका लढविताना सर्वच राजकीय पक्षांची मदत मिळू शकते, असा कयास बांधून त्यांनी लोकसेवा विकास आघाडीची स्थापना केली. त्या माध्यमातून तालुक्यातील विविध निवडणुका लढवित आहेत. त्यामुळे मुरकुटे यांच्या दौऱ्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.