निळवंडेचे पाणी सर्वांना मिळण्यासाठी पुढील काळात काम करणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी जनतेला मिळावे, हे स्वप्न ठेवून आपण काम केले. पुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल, यासाठी आपण काम करणार आहोत. निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचे

प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जलपूजन कार्यक्रमात आमदार थोरात बोलत होते.

आमदार थोरात म्हणाले, संघर्षातून समृद्धी निर्माण करणारा संगमनेर तालुका आहे. १९९९ पासून निळवंडेच्या कामाला आपण सुरुवात केली. रोज कामाचा आढावा घेतला. आदर्शवत पुनर्वसन केले.

धरणग्रस्तांना संगमनेर तालुक्यात जमिनी दिल्या सहकारी संस्थांमध्ये सन्मानाच्या नोकऱ्या दिल्या. प्रत्येक टप्प्यावर निधी मिळवला. कोरोना संकटातही काम सुरू ठेवले. या सर्व कामात ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची मदत झाली.

हे वेळोवेळी आपण जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी योगदान देणारे त्या ठिकाणी कोणीही नव्हते. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनाही बोलवले नाही.

अकोले तालुक्याचे आमदार यांनाही बोलवले नाही. एक प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारही नव्हता. ज्यांनी योगदान दिले ते तिथे नव्हते आणि ज्यांचे काही योगदान नाही, ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

डॉ. तांबे म्हणाले, आमदार थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर तालुक्यात समृद्धी आली. निळवंडे धरण व कालवे हे आमदार थोरात यांनी केले, इतर लोक श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. बाबा ओहोळ म्हणाले, की आमदार थोरात यांनी निळवंडेचे पाणी शेतात आणले.

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, अॅड. साहेबराव थोरात,

पद्माताई थोरात, बेबीताई थोरात, बाळासाहेब गायकवाड, दत्तात्रय थोरात, डॉ. दादासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश थोरात, संतोष हासे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.