Ahmednagar News : राहाता तालुक्याची कामधेनू म्हणून श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याची ओळख जिल्ह्यात आहे; परंतु बंद पडलेल्या या कारखान्याला भंगारच्या भावातसुद्धा कोणी खरेदी करत नव्हते; पण शेतकऱ्यांच्या हितासाठी पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाण्याने गणेश चालवून कर्जमुक्त केला.
सभासदांना साखर वाटून त्यांची दिशाभूल करून तुमच्या पॅटर्नच्या काळातील गणेशची कडू काहानी गोड करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जिल्ह्यातील साखर कारखान्यांपेक्षा उच्चांकी भाव देऊन दाखवा, असे आवाहन गणेशचे माजी संचालक राजेंद्र थोरात यांनी केले आहे.
याबाबत पत्रकात थोरात यांनी सांगितले, की श्री गणेश सहकारी साखर कारखाना बंद पडला आणि शेतकऱ्यांसह परिसर उजाड करण्याचे काम केले. तेच आज नीतिमत्तेच्या गप्पा मारत आहेत.
डॉ. विखे कारखान्याने गणेशचे खासगीकरण होऊ नये म्हणून गणेशची भंगार झालेली मशनरी मोठ्या हिंमतीने बदलली. बोजा स्वतःच्या नावावर घेतला. तसे केले नसते, तर आज तुम्ही कुठेच नसता. पूर्वीपासूनच गणेशवर कोल्हे पॅटर्नचे अपयशी वर्चस्व राहिले आहे.
गणेश कारखाना कसा चालविणार, यावर संगमनेर आणि संजीवनीचे नेते किती गुंतवणूक करणार, यावर बोलायला ते धजावत नाही. कारखाना बंद असताना त्यांनी तो सुरू का केला नाही? असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.
गणेशच्या निवडणूकीत दिशाभूल करून सत्ता कशी मिळविली, हे आगामी काळात स्पष्ट होणारच आहे. डॉ. विखे कारखान्याने गणेशच्या सभासदांना बरोबरीत उच्चांकी भाव देऊन कारखान्याचे आधुनिकीकरण करून आठ वर्षे कारखाना यशस्वीपणे चालवून, ऊसउत्पादक, शेतकरी, कामगार यांचे हित जोपासले;
परंतु विद्यामान संचालक मंडळ व त्यांचे दोन नेते गणेशवर कर्जाचा बोजा चढवून कारखाना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटण्याचे काम करत आहेत, हे सभासदांचे दुर्दैव आहे.
गाळप परवाना मिळू देत नाही, कर्ज मिळू देत नाही, असा अपप्रचार करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बदनाम करण्याचे काम केले जात आहे, असा आरोप थोरात यांनी केला आहे.