राजकारण

होय ते पैसे माझेच..पण.., पैशांसह कार्यकर्ते पकडल्यानंतर विवेक कोल्हेंचे मोठे स्पष्टीकरण

Published by
Ahmednagarlive24 Office

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाच्या पूर्वसंध्येला येवला व मनमाड शहरात पैसे वाटप करताना भरारी पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले. येवला शहरातील विठ्ठलनगर परिसरात तिघांना पथकाने ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून रोख २० हजार रुपये व मतदान साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पकडलेल्या व्यक्तींकडे विवेक कोल्हे यांच्या प्रचाराची पत्रके आढळून आली.

त्यामुळे हे पैसे वाटप करणारे उमेदवार विवेक कोल्हे यांचे समर्थक असल्याचे आरोप केले जात होते. दरम्यान आता यावर विवेक कोल्हे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

विवेक कोल्हे यांची प्रतिक्रिया काय?
राजकीय वजन वापरून आमच्यावर विविध पद्धतीचा अवलंब केला गेला. अनके ठिकाणी धाडी टाकून आमची काही कार्यकर्ते ताब्यात घेतले. जे पैसे सापडले ते पैसे आमचेच होते. परंतु ते पैसे कुठे वाटायला किंवा कुणाला द्यायला चालवले नव्हते.

तर ते पैसे संबंधित तालुक्यातील मंडप टाकणे असेल किंवा जे प्रचारक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्या नाश्त्यासाठी ते पैसे ठेवण्यात आले होते. परंतु खोटा आरोप करून आमच्या अनेक कार्यकर्त्यांना कसलाही पुरावा नसताना दिवसभर डांबून ठेवले गेले असे विवेक कोल्हे म्हणाले. तसेच मतदार सुज्ञ आहे त्यांना या गोष्टी समजतात असेही ते म्हणाले.

आज मतदान
नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या २१ पैकी ९ उमेदवार नगर जिल्ह्यातील आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून मतपत्रिका व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, नाशिक नंतर सर्वाधिक मतदार हे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नाशिकनंतर नगरचे मतदार हे उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

Ahmednagarlive24 Office