file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आलेल्या चक्रीवादळाचा फटका कोपरगाव तालुक्याला देखील बसला आहे.

मंगळवार (दि.२८) रोजी कोपरगाव विधानसभा मतदार संघात जोरदार अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना मंगळवार (दि.२९) रोजी रात्रीच महसूल आणि कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.

उद्या बुधवार (दि.३०) पासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानीचे पंचनामे केले जाणार असून ज्या शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकरी व नागरिकांनी तलाठी व कृषी सहाय्यकाच्या मदतीने आपल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यात मंगळवार (दि.२८) रोजी जोरदार अतिवृष्टी होवून शेतीचे व अनेक नागरिकांच्या घरांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे कोरोनावर उपचार घेत असलेल्या आ.आशुतोष काळे यांना समजताच त्यांनी सोमवारी रात्रीच त्या भागातील कार्यकर्त्यांना मदतीसाठी पाठविले होते.

ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पाणी साचून नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या त्याठिकाणी तातडीने जेसीबी पाठवून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून देत नागरिकांचे होणारे नुकसान टाळले आहे. अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार विजय बोरुडे व प्रभारी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिलेल्या आहेत. त्या सूचनेनुसार सर्व नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत.

शासनाच्या निकषानुसार ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास शेतकरी व नागरिक नुकसान भरपाईस पात्र ठरतात. रवंदा मंडलात मंगळवारी ६९.०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अशाच प्रकारे कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होवून नुकसान झाले आहे.

यापूर्वी देखील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कोट्यावधी रुपयांची भरपाई मतदार संघातील शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळवून दिली आहे. त्याप्रमाणे या नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना देखील महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

त्यामुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन रीतसर पंचनामे करून एकही नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा नुकसानीचा पंचनामा राहणार नाही याची खबरदारी महसूल व कृषी विभागाने घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या आहे.

ज्या शेतकऱ्यांचे व नागरिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्या शेतकरी व नागरिकांनी आपापल्या गावातील तलाठी व कृषी सहाय्यकांशी संपर्क करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे