अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- राहुरी फॅक्टरी परिसरातील वाणी मळा येथे नगर-मनमाड मार्गावर दुचाकी व मालवाहतूक ट्रकच्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

वाणी मळा येथील दूध उत्पादक शेतकरी प्रभाकर खांदे व त्यांची पत्नी विमल आज दुपारी दुचाकीववरून आश्वि(ता.संगमनेर) येथे मुलीच्या घरी पित्र जेवणासाठी चालले असताना नगर-मनमाड मार्गावर धनलक्ष्मी ट्रॅक्टर्स समोर पाठीमागून आलेल्या मालवाहतूक ट्रकने खांदे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या विमल खांदे(वय-४२)जागीच ठार झाल्या आहे. तर त्यांचे पती प्रभाकर खांदे किरकोळ जखमी झाले आहे. अपघाताची माहिती समजताच नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी, संदीप वरखडे , संजय वाणी, पवन उर्हे ,तसेच वाणी, वरखडे, खांदे वस्ती परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

साई प्रतिष्ठान रुग्णवाहिकाचे चालक रवी देवगिरे यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे नेला आहे. सायंकाळी वाणी मळा येथे मयत विमल खांदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान मध्यप्रदेश राज्यातील मालवाहतूक ट्रक चालक हा फरार झाला असता त्यास गुहा येथे पकडले असून त्याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

नगर-मनमाड मार्गावरील खड्ड्यामुळे हा अपघात झाला असून याप्रश्नी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वाणी-मळा पपरिसरातील नागरिकांनी दिला आहे.