Maharashtra news : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुरू असलेली आजची चौकशी टळली आहे. चौकशीसाठी तीन दिवसांची मुदत देण्याची गांधी यांची विनंती इडीकडून मंजूर करण्यात आली.

आता पुढील चौकशी सोमवारी (२० जून) होणार आहे. मात्र, इडीकडून अशी प्रदीर्घ चौकशी का सुरू आहे? आता पुढे काय होणार? त्यांना अटक होणार का? यासंबंधीही तर्कविर्तक लावले जाऊ लागले आहेत.

आपली आई आजारी असल्याचे कारण देत राहुल यांनी चौकशीला मुदतवाढ मागितली होती. आई आजारी असल्याने तिच्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळावा, असे त्यांनी म्हटले होते. ही मागणी इडीने मंजूर केली आहे.

दरम्यान, प्रदीर्घकाळ गांधी यांची चौकशी सुरू असल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. पहिल्या दिवसापासून यासंबंधी आदोलने सुरू आहेत.आतापर्यंतची ईडीची पद्धत पाहिली तर चौकशीनंतर अटक केली जाते.

मात्र, गांधी यांच्या बाबतीत वेगळी पद्धत अवलंबली जात असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ईडीकडून राहुल यांना अटक न करता चौकशी सुरू असतानाच तपास पूर्ण करून कोर्टात दोषारोपत्र दाखल केले जाऊ शकते.

त्यासोबतच राहुल यांनाही कोर्टात हजर केले जाऊ शकते. तेथे कोर्टातून त्यांची जामिनावर सुटका केली जाऊ शकते. अटक आणि त्यानंतर होणारी परिस्थिती टाळण्यासाठी इडीकडून हा पर्याय निवडला जाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आता सोमवारीच यासंबंधीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.