अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- पुढील दोन दिवस राज्यातील काही भागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे, यामध्ये ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर आणखी वाढला असला तरी ते किनारपट्टीपासून दूर आहे.

मात्र तरीही त्याचा परिणाम अद्याप कोकण किनाऱ्यावर होत असून, रविवारी संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.

मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर कोकण, गोव्यात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असले तरी ते किनारी भागापासून दूर जात आहे. याचा परिणाम म्हणून ८, ९ आणि १० नोव्हेंबर रोजी वादळी वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किमी राहील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये.