मुंबई : काल गुढी पाडव्याचा (Gudi Padva) दिवस मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चांगलाच गाजवला आहे. कालच्या भाषणात राज यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे यांनी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका केली आहे. यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचाही समाचार घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात. त्यांना नकला आणि टीका करण्याशिवाय काहीच येत नाही.

त्यांनी एकदा परीक्षण करावं की त्यांचे आमदार त्यांना सोडून का गेले. नुसती भाषणं करुन लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, राज ठाकरे हे केवळ पलट्या मारतात अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केलेल्या टीकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे, ते म्हणाले, ज्यांची अक्कल गुडघ्यात आहे, त्यांनी अक्कल दाढेवर बोलू नये, सध्या ते बिझी आहेत, अनेक जमिनी अलिबागमध्ये आहेत.

त्यांचा हिशोब इडीला द्यायचाय, हजारो कोटी मनपाचे खाल्ले त्यांचा हिशोब द्यायचाय, राज साहेब जे बोलले ते झोबलेले दिसतंय, असे म्हणत त्यांनी पलटवार केला आहे.

तसेच राऊतांचा भोंगा तर रोज सकाळी ९ ला वाजतोच. त्याला काय महत्व द्यायचं. शरद पवारांचा भोंगा वाजवणाऱ्यांना तेच दिसणार, राऊत पवारांचा भोंगा वाजवतात, अशी टीका त्यांनी केली आहे.