अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- नगर अर्बन सहकारी बँकेची निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आहेर यांनी बँकेला मतदार यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुढील महिन्यांत अर्बन बँकेचा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्बन बँक मल्टीस्टेट बँक आहे.

त्यामुळे केंद्रीय सहकार विभागाचे त्यावर नियंत्रण आहे. केंद्रीय निबंधकांनी व भारतीय रिझर्व बँकेनेही अर्बन बँकेची निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

त्याबाबतचे पत्रही राज्याच्या सहकार आयुक्तांना 16 सप्टेंबरला पाठविले होते. सहकार आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक आहेर यांची नियुक्ती केली आहे.

राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर करोना संसर्गामुळे निर्बंध आणले होते. आता निर्बंध हटवून निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे.

दरम्यान, मोठ्या थकबाकीमुळे रिझर्व बँकेने 1 ऑगस्ट 2019 रोजी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचे अधिकार गोठवून, बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली. प्रशासकाच्या ताब्यात जाऊनही बँकेचे थकित कर्ज फारसे वसुल झालेले नाही.