रिअल इस्टेट

प्रॉपर्टी एखाद्याला गिफ्ट करता येते का? व्यक्ती कोणती प्रॉपर्टी गिफ्ट करू शकतो? काय आहे यासंबंधी कायदा? जाणून घ्या माहिती

Published by
Ajay Patil

Property Gift Rules:- प्रॉपर्टी ही एक खूप संवेदनशील अशी बाब असून यासंबंधी अनेक कायदे आपल्या भारतात आहेत. आपल्याला माहित आहे की प्रॉपर्टीच्या संबंधी अनेक प्रकारचे वाद उद्भवतात व कधीकधी भावा भावांमध्ये आणि भाऊ बहिणींमध्ये सुद्धा प्रॉपर्टी वरून वाद होऊन अक्षरशः नाते तुटण्याची वेळ येते.

अशा प्रकारचे वाद कोर्टाच्या दारात देखील पोहोचल्याचे आपण बघतो. इतका हा विषय महत्त्वाचा आणि संवेदनशील असा आहे. त्यामुळे प्रॉपर्टीच्या बद्दल कुठलाही निर्णय घेताना तो कायद्याच्या कक्षेत राहून घेणे खूप गरजेचे असते. अगदी या अनुषंगाने जर आपण बघितले तर प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टी दान करण्याचा किंवा गिफ्ट देण्याचा अधिकार आहे.

परंतु त्यासंबंधी देखील कायदेशीर नियम असून त्या कायद्याच्या चौकटीतच राहून अशा प्रकारची मालमत्ता भेट वगैरे देता येते. त्यामुळे एखादी मालमत्ता जर भेट द्यायची असेल तर त्याचे कायदेशीर नियम काय आहेत? कोणती मालमत्ता भेट देता येऊ शकते? याबद्दलची माहिती असणे देखील तितकेच गरजेचे आहे.

मालमत्ता भेट किंवा गिफ्ट करणे म्हणजे नेमके काय?
एखादी प्रॉपर्टी एखाद्याला भेट किंवा गिफ्ट करणे म्हणजे मालक स्वतःच्या इच्छे नुसार त्याची प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करत असतो आणि त्या बदल्यात त्या व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा पैसा वगैरे घेत नाही.

परंतु अशाप्रकारे जर प्रॉपर्टी गिफ्ट करायची असेल तर मात्र विक्री करारानुसार गिफ्ट डिड करावे लागते. याबद्दल मालमत्ता हस्तांतरण कायदा खूप महत्त्वाचा असून त्या कायद्याच्या अंतर्गतच अशा प्रकारे मालमत्ता भेट देता येते.

कसे आहे मालमत्ता हस्तांतरण कायद्याचे स्वरूप?
मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 च्या कलम 122 नुसार जर आपण बघितले तर प्रॉपर्टी गिफ्ट देणे म्हणजे मालक स्वतःच्या इच्छेने ती मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करतो व त्या बदल्यात त्या व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारची किंमत किंवा पैसा न घेणे असा त्याचा अर्थ होतो.

या कायद्यानुसार मालमत्ता भेट करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला विक्री करारानुसार गिफ्ट डीड तयार करणे गरजेचे असते व ते तयार करून उपनिबंधक कार्यालयात त्याची नोंद करावी लागते.

जेव्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये ते नोंदणीसाठी येते तेव्हा रजिस्ट्रार त्यावर मुद्रांक शुल्क भरले गेले आहे की नाही याची देखील खात्री करतो. जेव्हा यासाठी आवश्यक असलेले मुद्रांक शुल्क भरले गेल्याची खात्री होते तेव्हाच गिफ्ट डिड लागू केले जाते.

प्रत्येक नावावर असलेली मालमत्ता गिफ्ट करता येते का?
तुमच्या नावावर म्हणजेच तुम्ही ज्या ज्या प्रॉपर्टीचे मालक आहात ती प्रत्येक प्रॉपर्टी तुम्ही गिफ्ट करू शकता का? हा देखील यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर जर बघितले तर ते मात्र नाही असे आहे. कायद्यानुसार तुम्हाला फक्त तीच प्रॉपर्टी भेट देता येऊ शकते जी तुम्ही स्वतः मिळवलेली असते.

तुम्हाला जर वारसा हक्काने प्रॉपर्टी मिळाली असेल तर अशी प्रॉपर्टी तुम्ही गिफ्ट करू शकत नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे अशा प्रॉपर्टी मध्ये पुढच्या पिढीच्या वारसांचा देखील हक्क असतो. एखाद्या मालमत्तेचे तुम्ही संयुक्त मालक असाल तर तुम्ही अशी मालमत्ता भेट देऊ शकत नाही.

परंतु वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेची विभागणी झाली असेल तर तुम्हाला मिळालेला हिस्सा तुमची स्व अधिग्रहित मालमत्ता बनते व अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तशी प्रॉपर्टी गिफ्ट करू शकता.

एकदा प्रॉपर्टी गिफ्ट केली तर ती परत घेता येऊ शकते का?
यामध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर अशा प्रकारे केलेले गिफ्ट डिड रद्द होऊ शकत नाही म्हणजेच गिफ्ट दिलेली प्रॉपर्टी परत होऊ शकत नाही. परंतु या कायद्याच्या कलम 126 मध्ये अशी काही विशिष्ट परिस्थिती नमूद करण्यात आलेले आहे व तशी परिस्थिती जर निर्माण झाली तर दिलेली प्रॉपर्टी साठीची गिफ्ट डिड रद्द होऊ शकते.

समजा तुम्ही एखाद्याला प्रॉपर्टी ज्या उद्देशाने भेट दिली आहे व समोरच्याकडून तो उद्देशच पूर्ण होत नसेल तर तुम्ही भेट दिलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकतात. दुसरे म्हणजे जी व्यक्ती प्रॉपर्टी भेट देत आहे ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी असणे गरजेचे आहे.

गिफ्ट देणारी व्यक्ती जर मानसिक दृष्ट्या अस्वस्थ किंवा निरोगी नसेल किंवा प्रॉपर्टीची भेट घेणाऱ्याने जबरदस्तीने किंवा कोणतीही फसवणूक करून मिळवली असेल तर अशा प्रकारचे कृत्य बेकायदेशीर घोषित केले जाऊ शकते व अशी प्रॉपर्टी परत मिळू शकते.

Ajay Patil