Investment In Plot:- बरेच व्यक्ती जमिन किंवा प्लॉटमध्ये गुंतवणूक करतात. बऱ्याचदा ही गुंतवणूक भविष्यामध्ये आपल्याला आर्थिक नफा चांगला मिळेल या अपेक्षेने केली जाते. जर आपण फ्लॅट किंवा घराच्या दृष्टिकोनातून बघितले तर अगदी कमीत कमी किमतींमध्ये प्लॉट मिळू शकतो.
त्यामुळे बरेच व्यक्ती हे प्लॉट खरेदीमध्ये पैसे गुंतवतात व भविष्यामध्ये प्लॉटच्या किमती वाढल्यानंतर त्याच्या विक्रीतून नफा कमवतात. अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील एखादा प्लॉटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर मात्र प्लॉटमधील गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे जाणून घेणे हे फायद्याचे ठरते. याविषयीचीच माहिती आपण या लेखात बघू.
प्लॉटमध्ये गुंतवणूक केल्यावर काय मिळतात फायदे?
1- जमीन म्हटले म्हणजे ती एक व्हॅल्यूएबल म्हणजेच मौल्यवान अशी संपत्ती समजली जाते. आपल्याला माहित आहे की नव्याने जमिनीची निर्मिती करता येत नसल्यामुळे उपलब्ध असणाऱ्या जमिनीला कालांतराने मोठ्या प्रमाणावर मागणी वाढून किंमत देखील वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत प्लॉटमधील गुंतवणूक फायद्याचे ठरते.
2- तुम्ही एखाद्या ठिकाणी प्लॉट खरेदी केला असेल व त्या ठिकाणी जर एखादा प्रोजेक्ट सुरू होणार असेल किंवा महत्त्वाच्या अशा पायाभूत सुविधा येणार असतील तर प्रकल्पांच्या किंवा पायाभूत सुविधांच्या आजूबाजूला असलेल्या जमिनीच्या किमतींमध्ये वाढ होते व त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो.
3- प्लॉट खरेदीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे प्लॉटचा ताबा मिळण्यासाठी तुम्हाला वाट पहावी लागत नाही. खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर आवश्यक कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण केली की लगेच तुम्हाला प्लॉटचा ताबा मिळतो.
4- समजा तुम्ही जर फ्लॅट खरेदी केला तर तुम्हाला मेंटेनन्स खर्चाचा विचार देखील करावा लागतो. परंतु त्या तुलनेत मात्र प्लॉट खरेदी केला तर तुम्हाला कुठलाही प्रकारचा मेंटेनन्स चार्ज देण्याची गरज भासत नाही.
5- तसेच तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लोन न घेता फ्लॅट घ्यायचा असेल तर बऱ्याचदा फ्लॅट घेणे अशक्य होते. परंतु एक गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला सहजपणे खरेदी करता येतो. कारण फ्लॅटच्या दहा टक्के रक्कमेत देखील तुम्ही प्लॉट खरेदी करू शकतात व कालांतराने कमी गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो.
प्लॉटमधील गुंतवणूक करण्याचे तोटे
1- जर एखाद्या फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीतून भविष्यात वाढलेल्या किमतीच्या माध्यमातून देखील पैसा मिळवता येतो व फ्लॅट भाड्याने देऊन देखील नियमित उत्पन्न मिळवता येते. परंतु प्लॉटमधील गुंतवणुकीतून अशा प्रकारच्या आर्थिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होत नाहीत.
2- प्लॉटमध्ये गुंतवणूक केली व तुम्हाला जर पैशांची गरज असेल तर लगेच प्लॉट विक्री करून पैसे मोकळे करता येत नाहीत. त्याला काही कालावधी लागू शकतो.
3- तुम्हाला प्लॉटमध्ये गुंतवणूक कर्ज घेऊन करायची असेल मात्र बँक कर्ज देण्याला टाळाटाळ करू शकते. तुम्ही प्लॉट घेऊन त्यावर एखादी मालमत्ता बांधणार असाल तर मात्र बँक तुम्हाला कर्ज देते. परंतु फक्त तुम्हाला प्लॉट खरेदी करायचा असेल व त्याकरिता कर्ज घ्यायचे असेल तर ते अवघड ठरते.
4- बरेच जण गुंतवणूक करतात तेव्हा त्यावर कर सवलत किंवा कर बचतीचे काही फायदे मिळतील का? या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असतात. परंतु प्लॉटमध्ये जर गुंतवणूक केली तर अशा प्रकारचा करात बचत किंवा कर लाभ मिळत नाही.
5- तुम्ही एखाद्या प्लॉटमध्ये गुंतवणूक केली व तो जर एनए नसेल तर मात्र तो एनए करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागू शकतो.
त्यामुळे प्लॉट खरेदी करायचा असेल तर त्याचे फायदे व तोटे जाणून घेऊन त्यानुसार निर्णय घेणे गरजेचे आहे व तसेच आपल्या आर्थिक क्षमतेचा विचार करून भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा काय आहेत याचा विचार करूनच प्लॉटमधील गुंतवणुकीचा निर्णय घेणे फायद्याचे ठरते.