Real Estate Update :- सध्या भारतामध्ये आणि एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई या शहरांमध्ये रियल इस्टेट क्षेत्र दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारत असून काही कोट्यावधींची उलाढाल रियल इस्टेट क्षेत्रात होत असते.
मुंबई खालोखाल जर आपण महाराष्ट्रातील पुणे या शहराचा विचार केला तर पुणे देखील वेगाने विकसित झाले असून अजून देखील मोठ्या प्रमाणावर पुणे शहराचा व परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे पुणे शहरांमध्ये आणि परिसरातील अनेक भागांमध्ये रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायला गुंतवणूकदार पसंती देताना दिसून येतात.
जर आपण पुणे शहरातील पिंपरी चिंचवडचा विचार केला तर पिंपरी चिंचवड शहराची खरी ओळख असलेले पिंपरी हे ठिकाण देखील अनेक कारणांमुळे रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा घर घेण्यासाठी खूप फायद्याचे आहे व
त्यामागे कारणे देखील तसेच आहेत. पिंपरी या ठिकाणी सोयी सुविधा मोठ्या प्रमाणावर असून सर्वच अत्यावश्यक पायाभूत सुविधांची या ठिकाणी रेलचेल आहे. यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेऊ.
पिंपरीमध्ये घर घेणे किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे का आहे फायद्याचे?
पिंपरी मुळेच पिंपरी चिंचवड शहर ओळखले जाते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर ती पिंपरीमध्ये मिळतेच मिळते. पिंपरी हे शहर पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा या शहराचा अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न बघत असतात.
तसेच हे ठिकाण अतिशय महागड्या घरांसाठी देखील प्रसिद्ध आहे व तरीदेखील या ठिकाणी घरांना खूप मोठी मागणी आहे. घरांसोबतच अनेक व्यावसायिक गाळे, दुकाने व गोडाऊन देखील घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्पर्धा दिसून येते. या ठिकाणी जर आपण बाजारपेठेंचा विचार केला तर कपड्यांपासून तर मोबाईल पर्यंत, मोठ्या हॉटेलपासून तर लहान लहान ठेल्यांपर्यंत, चौपाटीपासून तर छोटे-मोठे स्नॅक्स सेंटर व भाजीमंडईचा मोठा परिसर,
तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल वस्तू घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी असणारे मार्केट हब म्हणजेच पिंपरी होय. तसेच या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्टेशनमुळे पुण्यापासून लोणावळा पर्यंत थेट कनेक्टिव्हिटी देखील तुम्हाला मिळते. अनेक छोटे-मोठे दवाखान्याच्या माध्यमातून प्रगत वैद्यकीय सुविधा,
डी. वाय.पाटील तसेच वायसीएम आणि जिजामाता यासारखी खाजगी हॉस्पिटल, पुणे महामार्ग व छोट्या-मोठ्या दुकानांपासून मोठ-मोठे मॉल आणि ब्रँड असलेले स्टोर सर्व काही तुम्हाला पिंपरीमध्ये मिळते. या सगळ्या कारणांमुळे पिंपरी या ठिकाणी नागरिकांकडून घर घ्यायला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.
तुम्हाला सणासुदीची खरेदी करायची असेल किंवा भाजी मंडई मध्ये खरेदी करायचे असेल तर पिंपरी शिवाय पर्याय नसतो. पिंपरीमध्ये जर एखादा सदनिकांचा प्रकल्प उभारला तर आपल्याला कळत देखील नाही अशा पद्धतीने फ्लॅटची हातोहात विक्री होऊन जाते.
घर घेण्यासाठी पिंपरी उपयुक्त
पिंपरी मध्ये बाजारपेठा तर आहेतच परंतु शहरातील इतर ठिकाणांच्या तुलनेमध्ये जास्त पायाभूत सुविधा या ठिकाणी आहेत. सरकारी रुग्णालयांपासून खाजगी रुग्णालयांची संख्या देखील या ठिकाणी जास्त आहे. तसेच अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वैष्णोदेवी मातेचे मंदिर,
पिंपरीमध्ये असलेले साई मंदिर, शनी मंदिर तसेच सिंधी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले झुलेलाल मंदिर, खराळवाडीमध्ये असलेले विठ्ठल रखुमाईचे मंदिर सह अनेक देवी-देवतांचे भरपूर असे मंदिरे देखील या ठिकाणी आहेत. शैक्षणिक सुविधांचा विचार केला तर या ठिकाणी एमयुसीसी महाविद्यालय,
जयहिंद विद्यालय तसेच नव महाराष्ट्र विद्यालय यासारख्या अनेक छोट्या मोठ्या शाळा देखील आहे. तसेच पिंपरी या ठिकाणी उद्यानांची देखील मोठ्या प्रमाणावर रेलचेल आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर हेमू कलानी गार्डन,
लालबहादूर शास्त्री उद्यान यासारख्या उद्यानांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. चौका चौकांमध्ये छोटी मोठी उद्याने या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे पिंपरीमध्ये घर असावे हे बऱ्याच जणांच्या स्वप्न आहेत.
सदानिकांची पुनर्विक्री कराल तर मिळतो सोन्याचा भाव
या ठिकाणी विचार केला तर मोकळ्या जागा आता शिल्लकच राहिलेल्या नाहीत. त्यामुळे नवीन प्रकल्पांचे बांधकाम या ठिकाणी जवळजवळ नाहीत जमा आहे. त्यामुळे घर आणि गाळ्यांना मागणी जास्त व त्यामानाने पुरवठा कमी अशी परिस्थिती या ठिकाणी आहे.
त्यामुळे या ठिकाणी अगोदरच असलेल्या सदनिकांची जर पुनविक्री केली तर अशा सदनिकांना सोन्याचा भाव मिळतो. तसेच मागेल त्या किमतींमध्ये गाळे व दुकानाची विक्री केली जाते. जर तुम्ही घर किंवा दुकान भाडेतत्त्वावर दिले तरी देखील खूप मोठ्या प्रमाणावर भाडे मिळत असल्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पिंपरी हे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरताना दिसून येत आहे.