Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात ७ मे २०२२ रोजी लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. यात १३६३०९ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

यापैकी लोकन्यायालय व विशेष मोहीमेतील २४३३८ प्रकरणे तडजोडीने निकाली काढत ५५ कोटी ४० लाख ९४ हजार रूपयांची वसूली करण्यात आली. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोशिएशन व सेंट्रल बार असोशिएशन यांचे संयुक्त विदयमाने शनिवार, ७ मे २०२२ रोजी अहमदनगर येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्र राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये लोक अदालत संपन्न झाली. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्हयाचा महाराष्ट्रात पुन्हा एकदा व्दितीय क्रमांक आलेला आहे. अहमदनगर जिल्हयांनी राष्ट्रीय लोकअदालतध्ये सलग तिस-या वेळेला व्दितीय क्रमांक मिळवून, व्दितीय क्रमांकाची हॅट्रीक केलेली आहे.

राष्ट्रीय लोकअदालती मध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयांतील दिवाणी प्रकरणे, फौजदारी, एन. आय. अॅक्ट प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार न्यायालयांतील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, महावितरणाची समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयांत येण्याअगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे, आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती. अहमदनगर जिल्हयामध्ये १७७२० दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली.

तर २६१३ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, स्पेशल ड्राईव्ह (विशेष मोहीम) मध्ये ४००५ केसेस निकाली करण्यात काढण्यात आल्या. सदर लोकअदालतीध्ये ५५ कोटी ४० लाख ९४ हजार रुपयांची रकमेची वसूली करण्यात आली.

अहमदनगर जिल्हयातील सर्व न्यायालयांत हे लोकन् यायालय आयाजित करण्यात आले होते. लोकन्यायालय व स्पेशल ड्राईव्ह मध्ये एकुणे २४,३३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये वाहतुक यंत्रणांची प्रकरणे समाविष्ठ करण्यात आलेली नाहीत.

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर वें. यार्लगड्डा, न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर बार असोशिएशन अध्यक्ष अॅड अनिल सरोदे, सेंट्रल बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. श्री. सुभाष काकडे, सरकारी वकिल अॅड. सतिष पाटील व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांचे उपस्थितीत जिल्ह्यातील लोक अदालत पार पडल्या.

जिल्हा न्यायालयाचे प्रांगण रांगोळी व फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आले होते. सदरचे लोकन्यायालय न्यायाधीश, वकिल, पोलिस, विधी स्वयंसेवक व न्यायालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वी रितीने पार पडले.