अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता, असे म्हणणे अ‍ॅड. महेश तवले यांनी बोठे याच्या जामिन अर्जावरील सुनावणीदरम्यान शुक्रवारी न्यायालयासमोर मांडले. या अर्जावरील निर्णय मंगळवारी (७ सप्टेंबर) होणार आहे.

जरे हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयात १४ जुलै रोजी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केेला होता. यावर सरकार पक्षाने आधीच म्हणणे मांडले आहे. शुक्रवारी बोठेच्या वकिलांनी म्हणणे मांडले.

बोठे याचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता. पोलिसांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून बोठेला आरोपी म्हणून घोषित केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी घाईघाईने फरार घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता, असे ॲड. तवले यांनी सांगितले.

आरोपी सागर भिंगारदिवे याचे नाव बोठे याच्या हनीट्रॅपच्या वृत्त मालिकेत होते. असे असताना बोठे भिंगारदिवेला सुपारी का देतील, असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. न्यायालय मंगळवारी बोठेच्या जामीन अर्जावर निर्णय जाहीर करणार आहे.