अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे पैशाच्या देवाण घेवाण मधून एका वयोवृद्धेला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.(Elderly beaten)

याप्रकरणी पीडिता तस्लीम बेगम मशीहूल हसन खान (वय वर्षे 50, रा. समर्थ नगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत फिरडा दिली आहे.

यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले, खान या त्यांच्या घरात होत्या. त्यावेळी तेथे आरोपी सतीश वाघ व इतर तीन अनोळखी इसम हे तस्लीम बेगम खान यांच्या घरात घुसले.

त्यांना म्हणाले, तुमच्या मुलाला हात उसने दिलेले पैसे परत द्या. नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करून द्या. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली.

त्याचा राग आल्याने आरोपींनी तस्लीम बेगम खान यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून आरोपी सतीश आनंदा वाघ रा. अंबिका नगर,

राहुरी फॅक्टरी तसेच फॅक्टरी परिसरातील इतर तिघेजण अशा एकूण चारजणांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.