file photo

Ahmednagar News:काँग्रेस हा वास्तवापासून दूर गेलेला पक्ष आहे. विसंगतीमुळे काँग्रेसची काय गती झाली, हे देश पाहतो आहे. गांधी परिवारातील व्यक्तीव्यतिरिक्त तेथे अध्यक्षपदासाठी स्पर्धकच नाही.

सत्तेच्या काळात जनहिताचे निर्णय घेतले नाही म्हणून त्यांची ही अवस्था झाली असल्याचे महसूलमंत्री ना. विखे पाटील म्हणाले.

तसेच याचा परिणाम म्हणून काँग्रेस आत्मक्लेश करीत पदयात्रा काढणार आहे काय? असा सवाल करत महाविकास आघाडी सरकारच्या काळात अपमानाची वागणूक मिळत असताना देखील राज्यातील काँग्रेस सत्तेला गुळाच्या ढेपेला मुंगळा चिटकवून राहावा तशी राहिली होती.

मुळात राज्यात काँग्रेस राहिली कुठे ? अशी टीका केली. विरोधी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा यावेळी त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले, सत्ता गेल्याच्या वैफल्यग्रस्त भावनेतून राज्यातील विरोधक टीका करीत आहेत. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये सत्ता गेल्याच्या वेदना दिसतात.

शिंदे -फडणवीस यांचे सरकार हे लोकांच्या मनातील सरकार आहे. राज्यात लवकरच पालकमंत्र्यांच्या देखील नेमणुका होतील. मात्र, त्यामुळे कोणतेही काम थांबलेले नाही.

जिल्हा विभाजनाच्या प्रश्नाबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, जिल्ह्याला शेती सिंचनाच्या पाण्याच्या दृष्टीने संपन्न करणे, जिल्हा कृषी उद्योगाच्या दृष्टीने समृद्ध करणे याला आपली प्राथमिकता असेल.