अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- कर्जत नगरपंचायतकडे महावितरण कंपनीची विजेची थकबाकी राहिल्यामुळे महावितरण कंपनीने कर्जत शहरांमधील स्ट्रीट लाईट चे वीज कनेक्शन कट केले आहे.

यामुळे मागील दोन दिवसांपासून शहरातील काही भागातील रस्त्यांवर व उपनगरांमधील वीज खांबावर लाईट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरलेचे दिसून आले आहे.

दरम्यान महावितरणच्या या कृत्यामुळे अनेक भागातील रहिवाशांना रस्त्याने बाहेर पडताना अंधारात चाचपडत बाहेर पडावे लागत असल्याचे दिसून येते.

लहान मुले, स्त्रिया, वृद्ध व्यक्ती यांना याचा सर्वात जास्त त्रास जाणवत असून या अंधाराचा गैरफायदा बेकायदेशीर कामासाठी देखील काही प्रवृत्ती करू शकत असल्याचा धोका शहरांमध्ये निर्माण झाला आहे.

वर्षाचे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत आहेत.

मात्र शहरातील काही भागात रस्त्यावर लाईट नसल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात अंधार साम्राज्य निर्माण झाल्याची दिसून येते. महावितरण कंपनीने नगरपंचायतकडील विजेची थकबाकी वसूल करण्यासाठी रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद केली आहे.

मात्र याचा त्रास शहरातील त्या भागातील नागरिकांना सहन करावा लागला आहे त्यामुळे महावितरण कंपनीचा शॉक नागरिकांना बसला आहे.

दरम्यान रस्ते अंधारात सापडले असल्याने चोरीच्या घटना घडू शकतात. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करता बंद वीजदवे तातडीने सुरु करण्यात यावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.