file photo

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :-नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी करोना वॉर्डला लागलेल्या भीषण आगीत अकरा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे खापर सार्वजनिक बांधकाम विभागावर फोडत त्यांना जबाबदार धरले आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भेट दिली.

यावेळी त्यांच्यासोबत खा. डॉ. विखे होते. पंतप्रधान निधीतून दिलेल्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन ही आग लागल्याच्या आ. पवार यांच्या आरोपावर भारती पवार यांना विचारण्यात आले असता

त्यांनी खा. विखे यांना आ. पवार यांच्या आरोपावर भाष्य करण्यास सांगितले. त्यावर खा. विखे यांनी घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सकाळपासून येथे आहोत. पण कोणावरही आरोप केला नाही.

ही घटना आणि वेळ कोणावरही आरोप करण्यासारखी नाही. कोणी राजकारण जर येथे करत असेल आणि असे कोणी वक्तव्य करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया दिली.

दिवसभर न्यूज चॅनलवर झळकत राहण्यासाठी हा खटाटोप आहे. प्रत्येक गोष्टीत केंद्राकडे बोट दाखवायचे आणि आरोप करत राजकारण करायचे असाच काहीसा हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.