अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- शिर्डीतील श्री साईबाबांचे प्रसादालय राज्य शासनाचे नियम आणि अटी-शर्तीचे पालन करून सुरू करावे, अशी मागणी भारतीय जनता युवा वॉरियर्सच्यावतीने श्री साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानाईत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

याबाबत तुषार महाजन म्हणाले की, श्री साईबाबांचे प्रसादालय राज्य शासनाच्या नियम आणि अटीशर्तीचे पालन करत सुरु करावे. साईबाबा संस्थानच्यावतीने करण्यात आलेली दर्शन व्यवस्था उत्कृष्ट असून श्रीसाईबाबांचे दर्शन मनोभावे घेता आल्याचा आनंद भाविकांमधून व्यक्त होत आहे.

परंतु साईबाबांचा प्रसाद न घेता शिर्डीतून माघारी जाण्याची वेळ आली असल्याची खंत भाविकांनी बोलून दाखवली असून संस्थानने भाविकांच्या भावनेचा विचार करून लाडू प्रसाद व प्रसादालय सुरू करावे.

दोन वर्षापासून भाविकांसाठी प्रसादालय बंदच आहे. किमान प्रसादालय सोशल डिस्टसिंग, सॅनिटायझर व मास्क याचा वापर करून सुरू केल्यास गोरगरिबांना तसेच साईभक्तांना लाभ मिळेल.

त्यामुळे लवकरात लवकर प्रसादालय साईभक्तांसाठी अटी-शर्तीचे पालन करून सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.