file photo

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यात शालेय पोषण आहारातील तांदूळाची किराणा दुकानात विक्री करण्यात आली. याप्रकरणी आपल्याकडे सर्व पुरावे आहेत.

अध्यक्षा, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी नेमून त्यामार्फत या प्रकाराची चौकशीची मागणी सदस्य महेंद्र गोडगे यांनी केली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी हिवरेबाजार या ठिकाणी झाली. यावेळी सदस्य गोडगे यांनी पहिलाच प्रश्न शालेय पोषण आहाराचा विचारला.

2019-20 मध्ये शाळा सुरू असतांना प्राथमिक शिक्षण विभागाने 19 कोटी रूपयांचे पोषण आहाराचे बिल अदा केले. तर दुसर्‍या लाटेत शाळा बंद असतांना शिक्षण विभागाने 40 कोटी रुपये बिल कसे अदा केले, असा सवाल गोडगे यांनी उपस्थित केला.

शाळा बंद असतांना पोषण आहाराचा खर्च दुप्पट कसा झाला, असा त्यांचा सवाल होता. संगमनेर पंचायत समितीच्या सभापती यांनी देखील या विषयाला दुजोरा दिला.

गोडगे यांच्या आरोपात तथ्य असून या प्रकाराची चौकशी करणे आवश्यक असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी चुकीचे काम करणार्‍यांची गय केली जाणार नाही, त्यांना शिक्षा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

तसेच हा प्रकार गंभीर असून यात दोषी असणार्‍यांना सोडता कामा नये, असे सांगत अध्यक्षा राजश्री घुले यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले.