अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra news : छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभा खासदारकीची टर्म आज (३मे) रोजी समाप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज सकाळी ट्विटर फोटो पोस्ट करीत एक सूचक इशारा दिलेला आहे.

या फोटो मध्ये संभाजीराजे हे छत्रपती शाहू महाराजांचे पुस्तक वाचताना दिसत असून मागे छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मोठ्या तसबीरी आहेत.

तसेच शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज, संभाजीराजे यांचे आजोबा मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज व वडील विद्यमान छत्रपती शाहू महाराज यांच्याही प्रतिमा या फोटोमध्ये दिसत आहेत.

या फोटो सोबत संभाजीराजे यांनी “आजन्म विचारांशी बांधील” असेही म्हटले आहे. निश्चितच संभाजीराजे यांना ते आपल्या या पूर्वजांच्या विचारांशी बांधील आहेत, हेच म्हणायचे आहे.

काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी आपली पुढची राजकीय दिशा ३ मे रोजी माझी टर्म संपल्यानंतर जाहीर करेन, असे सांगितले होते.

आज संभाजीराजे यांनी हा फोटो ट्विट करीत एक सूचक कल्पना दिली आहे का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कालच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे काँग्रेस मध्ये यावेत, अशी इच्छा जाहीररित्या व्यक्त केली.

या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे हे ट्विट त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याचा एक सूचक अंदाज देणारे आहे.