मुंबई : भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आक्रमक भूमिका कायम आहे, मात्र त्यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

यावरूनच मेळाव्याच्या निमित्ताने पुण्यात शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आले असता त्यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून भाजपवर (Bjp) गंभीर आरोप केले आहेत.

तसेच राज ठाकरे यांची भूमिका हिंदुत्वाच्या विरोधात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शिर्डीच्या साई मंदिरात, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काकड आरती होऊ शकली नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

ते म्हणाले, राज ठाकरे चांगले व्यंगचित्रकार (Cartoonist) होते, मात्र भाजपाने त्यांच्या व्यंगचित्राचा गळा घोटला आहे. तसेच भोंग्यांच्या प्रकरणामुळे भाजपाने राज ठाकरे यांच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटलाय, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

तसेच भाजपाला नेमके कोणत्या दिशेला जायचे आहे, ते कळत नाही. भाजपा हा पक्ष गोंधळलेला स्थितीत आहे. देवेंद्र फडणवीस एकीकडे, रावसाहेब दानवे एकीकडे ते एकमेकांच्या तंगडीत तंगडी घालत आहेत, अशी टीका त्यांनी केली. अनेक व्यंगचित्रकारांना आता लाइनही वाचत येत नाही आणि काही लाइनही बदलतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

त्यासोबतच पुढे ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे राजकारणी आणि व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांना कोणत्याही भाडोत्री भोंग्याची गरज लागली नाही. पण भाजपाने व्यंगचित्रकलेचा गळा घोटला आहे. देशात सध्या जे काही चालले आहे, त्यावर भाष्य करण्याची क्षमता व्यंगचित्रकलेत आहे.

पण ज्यांच्यामध्ये व्यंगचित्रकलेची ही क्षमता आहे, त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केले आणि लाइन बददली, असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.