अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज राज्यभर महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात देखील बंद पाळण्यात आला. लखीमपुर खिरी येथील ४ शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने चिरडून ठार मारले ही घटना अत्यंत निंदनीय असून न्याय हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांना लोकशाहीमध्ये चिरडल्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला.

यावेळी संगमनेर बस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशातील त्या शेतकऱ्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी यावेळी केली.

दरम्यान संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आ डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष, आरपीआय गवई गट, छात्रभारती,

पुरोगामी व इतर मित्र पक्षांच्या वतीने करण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संगमनेर शहर व तालुक्यातील १७१ गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.