PIB Fact Check : जनतेच्या हितासाठी केंद्र सरकार (Central Govt) विविध योजना (scheme) राबवत असते. अशातच काही बनावट योजनाही व्हायरल होत असतात.

लोकही त्याला बळी पडतात. त्यामुळे कोणत्याही योजनेत गुंतवणूक (Investment) करण्यापूर्वी त्या योजनेबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

दर महिन्याला मुलींना मिळत आहेत 2500 रुपये!
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री कन्या सन्मान योजने’अंतर्गत मुलींना दर महिन्याला 2500 रुपये दिले जात असल्याचा दावा अनेक यूट्यूब चॅनल्सद्वारे केला जात आहे. हे पैसे थेट मुलीच्या बँक (Bank) खात्यात पोहोचत आहेत.

याशिवाय युट्यूब चॅनलवर असाही दावा केला जात आहे की, ‘महिला स्वरोजगार योजने’अंतर्गत सरकार सर्व महिलांच्या खात्यात एक लाख रुपये ट्रान्सफर करत आहे. याद्वारे महिला आपला व्यवसाय करू शकतात.

25 लाखांचे कर्ज हमीशिवाय आणि व्याजाशिवाय!
सरकारच्या ‘नारी शक्ती योजने’ (Naari Shakti Yojana) अंतर्गत, SBI देशातील सर्व महिलांना(Womens) हमीशिवाय आणि व्याजाशिवाय 25 लाख रुपयांचे कर्ज देत आहे. या व्हायरल मेसेज आणि यूट्यूब चॅनलवर असा दावाही केला जात आहे की ही योजना संपूर्ण भारतातील महिलांसाठी आहे.

पीआयबीने (PIB) अशा सर्व योजनांना बनावट म्हटले आहे. पीआयबीने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, काही यूट्यूब चॅनलवर विविध सरकारी योजनांशी संबंधित माहिती दिली जात आहे, जी प्रत्यक्षात नाही. फसवणूक करणाऱ्यांनी चुकीच्या भावनेने तयार केलेल्या अशा साहित्याला बळी पडू नका.

या व्हिडिओंमध्ये नमूद केलेल्या वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका, असेही पीआयबीकडून सांगण्यात आले. सायबर गुन्ह्यांमध्ये सामील असलेले लोक तुमच्या वैयक्तिक तपशीलाचा वापर करू शकतात.