Maharashtra news : चौंडी येथे ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार व होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केली एक मागणी पवार यांनी काही दिवसांतच पूर्ण केली आहे.

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या वाफगावच्या किल्ल्यातील रयत शिक्षण संस्थेची शाळा अन्यत्र हलवून हा किल्ला होळकर कुटुंबबियांच्या ताब्यात देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

धनगर समाजासाठी हा मोठा निर्णय असून याचा फायदा त्यांचे नातू रोहित यांनाही होणार आहे.चौंडीतील कार्यक्रमात झालेल्या मागणीनुसार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाफगाव किल्ल्याची पाहणी करण्यासाठी गेले होते.

त्यांच्या सोबत रोहित पवार आणि भूषणसिंह राजे होळकर उपस्थित होते. होळकर कुटुंबीयांनी परिसरातील मुलामुलींचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी वाफगाव येथील आपली जागा व वाडा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना १९५० मध्ये दिली. तेथे गेल्या अनेक वर्षांपासून तिथे रयत शिक्षण संस्थेची म. य होळकर विद्यालय ही शाळा सुरू आहे.

आता ३ कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी नवीन शाळा उभारली जाणार असून त्यातील १ कोटी रुपये रयत शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येतील, अशी घोषणा यावेळी पवार यांनी केली. उर्वरित २ कोटी रुपयांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, आमदार दिलीप मोहिते व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही वाटा उचलण्याची तयारी दर्शवली.