मुंबई : राष्ट्रवादीचे (Ncp) आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपकडून (Bjp) मात्र या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

या प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राष्ट्रवादी व शरद पवार (Sharad Pawar) यांना आवाहन केले असून ते म्हणाले, अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे.

समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत.

ही राष्ट्रवादी काँग्रेसची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना केले आहे.

तसेच राष्ट्रवादीचे (ncp) पुरोगामीत्व हा केवळ आव आहे. त्यांना समाजातील दुर्बल घटकांना टार्गेट करायचं आहे. मग्रुरी दाखवायची ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची पद्धतच असल्याचे ताज्या घटनेवरून स्पष्ट झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, हिंदू समाजातील पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुस्लिम अथवा अन्य धर्मियांच्या धर्मगुरुंची टिंगल करायची हिंमत होत नाही, हे आश्चर्यकारक आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार आस्तिक आहेत की नास्तिक आहेत हे माहिती नाही पण त्यांच्या पक्षाचे नेते आवर्जून हिंदू पुरोहितांची टिंगल करतात हे मात्र सर्वांना दिसते, असेही चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले आहेत.