अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहे. यातच मध्यप्रदेश मध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.(Accident news)

मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात एक बस नदीत पडल्याने एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले.

याबाबात पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अलीराजपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १५ किमी अंतरावर गुजरात सीमेला लागून असलेल्या चंदपूरमध्ये ही घटना घडली.

ही खासगी बस गुजरातमधील छोटा उदयपूर येथून अलीराजपूरकडे येत असताना मेळखोदरा नदीवरील पुलावरून बस खाली पडली. या अपघातात कैलास मेदा (४८), त्यांची पत्नी मीराबाई (४६) आणि एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.

अपघातात जखमी झालेल्या २८ जणांना अलीराजपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चांदपूर पोलिसांनी सविस्तर तपास सुरू केला आहे. दरम्यान जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना देण्यात आले आहेत.