अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यातच अतिवृष्टीचा चांगलाच फटका मराठवाड्याला बसला असून येथील सुमारे 22 लाखहुन अधिक हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे.

याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. तसेच मराठवाड्यातील या अतिवृष्टीमध्ये 436 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तसेच 196 नागरिकांना वीज पडल्यानं मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. राज्यात गुलाब चक्रीवादळाचा जोरदार फटका मराठवाड्याला बसला आहे.

गुलाब चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास हिरावून घेतला आहे.

तसेच सोयाबीन, ऊस, कापुस आणि अन्य खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ‘अतिवृष्टीतील नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ आढावा बैठक घेत जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी मदत कार्य पोहचवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

तसेच मुख्यमंत्री ठाकरे लवकरच येथील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा करणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ‘अतिवृष्टीमुळे सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यासह एकूण 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. औरंगाबादमध्ये महिन्यात 71 जणांच्या मृत्यूची नोंद झाली.