अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- ठाणे महानगरपालिकेच्या डाॅक्टर आणि नर्सने चक्क एका ठाणेकराला कोरोना ऐवजी रेबीजची लस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान रेबीजचं इंजेक्शन दिलेल्या व्यक्तीला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात कोरोना लसीकरण सुरू असताना हा प्रकार घडला आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर तातडीने चौकशी करुन आज दुपारी महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

हलगर्जीपणाची ठाण्यातील ही पहिलीच घटना नाही. याआधी ठाणे महापलिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या 28 वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस देण्यात आले होते.

ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा इथल्या कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे सांगत चक्क एका महिला सेलेब्रिटीने लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आली होती.

या महिला सेलिब्रेटीला फ्रंटलाईन वर्करचे ओळखपत्र देण्यात आलं होतं. ‘वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांमुळे पालिकेची नाहक बदनामी होत आहे.

हे असंच सुरू राहिले तर आरोग्य विभागात मोठे फेरबदल करावे लागतील, असा इशाराही महापौर नरेश म्हस्के यांनी दिला.