Maharashtra News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईसंबंधीच्या व्यक्तव्याने मारवाडी, गुजराथी, राजस्थानी समाजही त्यांच्यावर नाराज झाला आहे. या वक्तव्यामुळे आमच्या समाजाबद्दल गैरसमज व द्वेष पसरल्याचा आरोप करण्यात येत आहे.

त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावून राज्यपालांना परत पाठविण्याचा ठराव करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांकडे करण्यात आली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते अड. श्याम आसावा यांनी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, राज्यपाल कोश्यारी यांनी मारवाडी, गुजराथी, राजस्थानी लोकांच्या बाबतीत वादग्रस्त व निंदनीय विधान केले. या वक्तव्यामुळे विविध जाती धर्मातील लोकांमध्ये गैरसमज व द्वेष पसरून सामाजिक व सौहार्दपूर्ण शांतिपूर्ण वातावरण बिघडले आहे.

त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. विशेषाधिकारामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई शक्य नाही. त्यामुळे तातडीने विशेष अधिवेशन बोलावून त्यात कोश्यारी यांना राज्यातून परत बोलविण्याचा ठराव करावा, अशी मागणीही आसावा यांनी केली आहे.