मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ५ जूनला अयोध्येत (Ayodhya) जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्यांच्या अयोध्या दौऱ्याला कैसरगंजचे भाजप (Bjp) खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध करत काही अटी ठेवल्या आहेत.

यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनाही राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांची भेट न घेण्याचा सल्ला बृजभूषण सिंह यांनी दिला आहे.

तसेच ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी एका पाठोपाठ एक ट्विट (Tweet) करत राज ठाकरेंवर हल्ला चढवला. यामध्ये त्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप करत, यासाठी राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.

ट्विट करत ते म्हणाले, “उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी.”

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सल्ला देत बृजभूषण शरण सिंह यांनी ट्विट केले की, ”जोवर राज ठाकरे उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, तोवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भेटू नये, अशी आपली विनंती आहे.

” एवढेच नाही, तर ”राम मंदिर आंदोलनापासून ते मंदिर उभारण्यापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद आणि सर्वसामान्यांचीच महत्वाची भूमिका आहे. ठाकरे कुटुंबाचा याच्याशी कसलाही संबंध नाही,” असेही बृजभूषण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.