अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 maharashtra news : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि एकूणच पवार कुटुंबियांवर सातत्याने कडवी टीका करणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्याला कारणंही तसंच होतं. विधिमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने कर्जत-जामखेड या मतदारसंघाला भेट दिली.

या समितीचे अध्यक्ष आमदार शांताराम मोरे आहेत. याशिवाय संजय जी दौंड, डॉ. रत्नाकर गुट्टे जी, गोपीचंद पडळकर आणि बळवंत वानखेडे हे आमदार समितीचे सदस्य आहेत.

या समितीने जामखेडमध्ये भेट दिली. त्यावेळी आमदार पवार यांनी या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्यानं पडळकरांसह सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या समितीने संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. कामांना भेटी दिल्या. ऐतिहासिक खर्ड्याच्या किल्ल्याला भेट दिली. तेथे आमदार पवार यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या देशातील सर्वांत उंच भगव्या स्वराज्य ध्वजाचीही समितीने पाहणी केली.

स्वत: आमदार पवार यांनी आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरून ही माहिती शेअर केली आहे. ही भेट राजकीय स्वरूपाची नाही.

यामध्ये राजकीय चर्चाही अपेक्षित नसते. तशी ती झालीही नाही. मात्र, पवारांवर सातत्याने टीका करणारे पडळकर यांनी पवारांच्या मतदारसंघात येऊन कामांची पाहणी केली. यावर त्यांनी अद्याप तरी काहीही भाष्य केलेलं नाही.