Ahmednagar News:आज एकीकडे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे मात्र शाळेच्या वर्गखोल्यांसाठी दिलेला निधी परस्पर दुसरीकडे खर्च केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय येत आहे.

त्यामुळे याप्रकरणाची तात्काळ दखल घेण्यासाठी स्वातंत्र्य दिनी येथील विद्यार्थी व पालक वर्ग आमरण उपोषण करणार आहेत.

या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास शाळेकडुन दाखले घेऊन शाळा बंद करण्याचा इशारा या पालकांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव शहरातील शास्त्रीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिले-चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या एकुण दहा तुकड्या आहेत.

मात्र विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फक्त दोनच वर्ग खोल्या व्यवस्थित आहेत. इतर वर्ग खोल्यांच्या छताला गळती लागली आहे, तर भिंती कधी पडतील याचा भरवसा नाही.

त्यामुळे पालकांनी बैठक घेऊन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन शाळा खोल्यांची दुरुस्ती मागणी केली असता नऊ लाख रुपयांचा निधी दिला.

मात्र हा निधी परस्पर अन्य ठिकाणी खर्च केला आहे. त्यामुळे तीन वर्षात दुरुस्ती प्रस्ताव ,निर्लेखन प्रस्ताव पाठवुन देखील शिक्षण विभागाने कोणताही प्रस्ताव मंजूर केला नाही.

परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे शाळा दुरुस्तीसाठी मंजुर झालेल्या निधी परस्पर अन्यत्र पळविण्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत.

यासाठी दि.१५ ऑगस्ट रोजी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर शाळेचे विद्यार्थी – महिला-पालकासह आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.

या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास शाळेकडुन दाखले घेऊन थेट ही शाळाच बंद करण्याचा देखील त्यांनी नमूद केले आहे.