अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही, म्हणून पतीने पत्नीला लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केली. २४ डिसेंबर रोजी ही घटना घडली असून पत्नीवर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(crime news)

मंदा नारायण चव्हाण (वय २९) या राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे राहतात. त्यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास या घटनेतील आरोपी त्यांचा पती नारायण बाजीराव चव्हाण याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते.

त्यावेळी मंदा चव्हाण यांनी पैसे दिले नाही. याचा राग आल्याने आरोपी नारायण चव्हाण याने त्याची पत्नी मंदा यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

मंदा चव्हाण यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन त्यांच्या पती विरोधात फिर्याद नोंदवली. यावरून त्यांचे पती आरोपी नारायण बाजीराव चव्हाण याच्या विरोधात पोलिस ठाण्यात मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष राठोड करीत आहेत.