स्पेशल

जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी आता 50 हजार नाहीतर मिळतील 1 लाख! ‘या’ योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व अनुदानांमध्ये सरकारने केली वाढ

Published by
Ajay Patil

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेती आणि शेती क्षेत्राच्या विकासाकरिता अनेक महत्त्वपूर्ण अशा योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून शेतीकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करता यावी यासाठी अनुदान स्वरूपामध्ये आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्यात येते.

शासनाच्या माध्यमातून ज्या अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना होय. या योजनेच्या माध्यमातून जुन्या विहिरीची दुरुस्ती तसेच नवीन विहीर खोदणे, इनवेल बोरिंग व आवश्यक यंत्रसामग्री इत्यादी बाबींकरिता अनुदान देण्यात येते.

या महत्त्वपूर्ण अशा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष आता सुधारून त्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.या निर्णयानुसार आता या योजनेअंतर्गत येणाऱ्या बाबींवर मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे.

 बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील अनुदानामध्ये वाढ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे जे काही निकष आहेत त्यामध्ये सुधारणा करून विहिरी तसेच शेततळे व वीज जोडणी इत्यादीं करिता या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार जर आपण करण्यात आलेल्या अनुदानातील वाढ पाहिली तर ती….

 सिंचन विहिरींकरिता या अगोदर अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. आता ते चार लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. तसेच जुन्या विहिरींच्या दुरुस्ती करिता अगोदर 50 हजार रुपये अनुदान मिळत होते तर ते आता वाढवून एक लाखापर्यंत करण्यात येणार आहे.

यासोबतच इनवेल बोअरिंग करिता अगोदर 20 हजार रुपये अनुदान मिळत होते व ते आता वाढवून चाळीस हजार रुपये करण्यात येणार आहे. यंत्रसामग्रीसाठी  पन्नास हजार रुपये, परसबागे करिता पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच नवीन विहीर खोदण्यासाठी जी काही बारा मीटर खोलीची अट होती ती देखील आता रद्द करण्यात आलेली आहे.

इतकेच नाही तर शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या या योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपये अनुदान देण्यात येते. परंतु आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा दोन लाख यापेक्षा जे कमी असेल इतके देण्यात येणार आहे. तसेच तुषार सिंचनासाठी सध्या पंचवीस हजार रुपये देण्यात येतात व आता या सुधारणेनंतर तुषार सिंचन संच 47 हजार रुपये

किंवा त्यासाठी लागणाऱ्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. ठिबक सिंचनाकरिता अल्प, अत्यल्प व बहुभूधारकांना 97 हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90% पैकी जे कमी असेल इतके अनुदान देण्यात येणार आहे.

Ajay Patil