7th Pay Commission DA Hike : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून केंद्रीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी केंद्रीय कर्मचारी असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी 4 टक्क्यांनी वाढणार आहे.
लेबर ब्युरोने जारी केलेल्या एआयसीपीआयच्या निर्देशांकाच्या आधारावर हा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये दिवाळीत कर्मचाऱ्यांना मोठी भेट देताना केंद्र सरकारने महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर नेला होता.
वाढीव महागाई भत्ता जुलैपासून देण्यात आला होता. दरम्यान आता जानेवारी 2024 पासून या 46 टक्के महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ होणार आहे. म्हणजेच महागाई भत्ता 50% होईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
विशेष बाब अशी की फक्त महागाई भत्ताच वाढणार नाही, तर महागाई भत्ता 50% झाल्यानंतर घर भाडे भत्ता म्हणजे एचआरए देखील वाढवला जाणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात लवकरच मोठी वाढ होईल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.
सध्या किती मिळतोय घरभाडे भत्ता
केंद्रीय कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता देतांना त्यांचे X, Y आणि Z अशा श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. या श्रेणी कर्मचाऱ्यांच्या शहरानुसार ठरवल्या आहेत.
सध्या स्थितीला X श्रेणी अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 27%, Y श्रेणी अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 18 टक्के आणि Z श्रेणी अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 9 टक्के एवढा एचआरए मिळत आहे.
मात्र जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% क्रॉस करेल तेव्हा यामध्ये आणखी वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
किती वाढणार घरभाडे भत्ता
मीडिया रिपोर्ट नुसार, जेव्हा महागाई भत्ता 50% क्रॉस करेल तेव्हा घरभाडे भत्ता तीन टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. यानुसार एक्स श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 30 टक्के, वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 20 टक्के आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 10% एवढा घर भाडे भत्ता मिळणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
मात्र याबाबतची घोषणा जेव्हा महागाई भत्ता 50% क्रॉस करेल तेव्हाच होणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे.