7th Pay Commission News : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलाय.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय. आधी केंद्रिय कर्मचाऱ्यांना फक्त 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्रातील सरकारने घेतलाय.
महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेला हा महागाई भत्ता जुलै 2024 पासून लागू करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही 50% दराने महागाई भत्ता मिळतोय.
यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% कधी होणार हा मोठा सवाल उपस्थित होत आहे. खरे तर राज्य कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू करावी अशी मागणी केली जात आहे.
मात्र सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे.यामुळे आचारसंहिता कालावधीत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करता येणे शक्य नसल्याचे काही जाणकारांकडून सांगितले जात आहे.
परंतु राज्य कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढ लागू करण्यासाठी आचारसंहितेचा कोणताच अडसर ठरत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ ही विधानसभा निवडणुकीनंतरच लागू होणार असे दिसत आहे.
सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून विधानसभा निवडणुकीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्के करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी याबाबतचा निर्णय होण्याची आशा व्यक्त होत आहे. यामुळे महागाई भत्ता वाढीचा लाभ नोव्हेंबर महिन्याच्या पगारा सोबतच मिळणार आहे.
तथापि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि 23 तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
दरम्यान निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे नवीन सरकार सत्तेत येईल ते नवीन सरकारच राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेणार आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत निर्णय जारी होण्याची शक्यता आहे.