स्पेशल

घरातील खराब इन्व्हर्टर वरून व्यवसायाची कल्पना सुचली! आज हाच व्यवसाय आहे 2300 कोटींच्या घरात; वाचा कुंवर सचदेव यांची यशोगाथा

Published by
Ajay Patil

Business Success Story:- डोक्यामध्ये एखादी कल्पना येणे आणि त्या कल्पनेला व्यवसायाच्या स्वरूपात प्रत्यक्षात आणणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. अशा पद्धतीने जर व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत करावी लागते व प्रयत्नांमध्ये देखील सातत्य ठेवावे लागते.

या खडतर मार्गावर चालताना अनेक प्रकारच्या अडचणी आल्या तरी न डगमगता त्या अडचणींशी दोन हात करत त्यातून मार्ग काढत यशाच्या शिखराकडे वाटचाल करणे खूप गरजेचे असते. याच पद्धतीने तुम्ही कुठलीही गोष्ट करायला गेला तरी तुमच्यामध्ये ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रयत्न 100% असणे गरजेचे असते.

तरच व्यक्ती कुठेतरी यशस्वी होत असतो. आज आपण समाजामध्ये व्यवसायात यशस्वी झालेले व्यावसायिक व उद्योजक बघतो तेव्हा आपल्याला नक्कीच त्यांच्याबद्दल अप्रूप वाटते. परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचा जर त्यांचा प्रवास पाहिला तर मात्र तो असंख्य अशा खाचखडग्यानी आणि काट्याकुट्यांनी भरलेला असतो.

या सगळ्या विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत हे उद्योजक यशस्वी झालेले असतात. अगदी याच मुद्द्याला धरून आपल्याला इन्वर्टर मॅन म्हणून ओळखले जाणारे कुंवर सचदेव यांची यशोगाथा सांगता येईल.

त्यांनी सु-काम(Su-Kam) नावाची कंपनी सुरू केली व ही कंपनी आज सौर उत्पादने विकण्याचे महत्वपूर्ण काम करते. या कंपनीच्या उत्पादनांची मागणी आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे. परंतु आज त्यांच्या या व्यवसाय मागील जर त्यांचे प्रयत्न आणि कल्पना पाहिली तर ती इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

 कुंवर सचदेव यांची यशोगाथा

जर आपण त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर उच्च शिक्षण घेऊन त्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर बनुन करिअर करायचे होते. परंतु सगळे प्रयत्न करून देखील ते मेडिकलसाठी आवश्यक असणारी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत व त्यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. त्यांचे वडील रेल्वे विभागामध्ये क्लर्क या पदावर होते.

या सगळ्या परिस्थितीमध्ये शिक्षण तर करायचे होते परंतु खर्च स्वतः करण्यासाठी त्यांनी पेन विकायला सुरुवात केली व स्वतःच्या पायावर त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण जेव्हा पूर्ण झाले तेव्हा त्यांनी एका केबल कम्युनिकेशन कंपनीमध्ये मार्केटिंग विभागात नोकरी करायला सुरुवात केली.

तेव्हा त्यांना कळून चुकले की केबलचा बिजनेस हा फायद्याचा बिझनेस असल्याने आपण का हा बिजनेस करू नये हा विचार त्यांच्या मनात आला व लागलीच त्यांनी नोकरी सोडून सुकाम कम्युनिकेशन सिस्टम नावाने व्यवसायाला सुरुवात केली.

 अशाप्रकारे सुचली व्यवसायाची कल्पना

कुंवर सचदेव यांच्या घरामध्ये असलेला इन्व्हर्टर वारंवार खराब व्हायचा. एके दिवशी सहजच त्यांनी तो इन्व्हर्टर खोलला व त्याला चेक करण्याचा प्रयत्न केला. हे सगळे काम करत असताना त्यांच्या डोक्यात आले की आपण जर इन्वर्टर बनवायला सुरुवात केली तर? हा प्रश्न मनामध्ये तरळला आणि त्यांनी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला

अशा पद्धतीने सुकाम या कंपनीची सुरुवात झाली. आज ही कंपनी अनेक सोलर उत्पादने बनवते. त्यांच्या कंपनीचे मूल्य आज 2300 कोटींच्या घरात असून या कंपनीच्या सोलर प्रॉडक्ट दिवसाला दहा तासांची वीज देऊ शकतात. जर आपण भारताचा विचार केला तर जवळपास एक लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये त्यांच्या या कंपनीचे सोलर प्रॉडक्ट  वापरण्यात येतात.

Ajay Patil