Marathi News : मणिपूरची राजधानी इम्फाळच्या विमानतळ परिसरात अज्ञात उडती वस्तु अर्थात यूएफओ दिसल्याची विचित्र घटना समोर आली आहे. यूएफओची माहिती मिळाल्यानंतर भारतीय वायुदलाच्या दोन राफेल लढाऊ विमानांनी विमानतळावर घिरट्या घालत
अज्ञात तबकडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण वायुदलाच्या हाती काही लागले नाही. पण तत्पूर्वी अज्ञात वस्तूमुळे काही व्यावसायिक विमानांना या घटनेचा फटका बसला.
रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास इम्फाळ विमानतळावर एक अज्ञात वस्तू उडताना दिसून आली. अनेकांनी या अज्ञात वस्तूला यूएफओ म्हटले. ही परग्रहवासीयांची उडती तबकडी असल्याचा दावाही करण्यात आला.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर वायुदलाकडून अज्ञात वस्तूचा शोध घेण्यासाठी एकापाठोपाठ दोन राफेल लढाऊ विमानांना पाठवण्यात आले. अज्ञात वस्तूचा वेध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज लढाऊ विमानांनी अगदी कमी उंचीवरून मार्गक्रमण केले;
परंतु त्यांना आकाशात कुठल्याही प्रकारची संशयित वस्तू आढळली नाही. पण अज्ञात वस्तूचे अनेक व्हिडीओ समोर आल्याने, त्याचा शोध घेण्याचे काम सातत्याने केले जात आहे. स्थितीचा आढावा घेतल्यानंतर विमानतळावरील उड्डाण सेवा पूर्ववत करण्यात आली,
तर खबरदारी म्हणून वायुदलाच्या पूर्व कमांडकडून हवाई संरक्षण प्रणाली सुरू करण्यात आल्याचे समजते. चीनचा धोका लक्षात घेत भारताने राफेल लढाऊ विमानांची एक तुकडी पश्चिम बंगालच्या हाशीमारा हवाईतळावर तैनात केली आहे. राफेल विमानांनी नुकतेच चीन सीमेलगत झालेल्या वायुदलाच्या ‘पूर्व आकाश’ युद्धाभ्यासात भाग घेतला होता.