वाढत्या उष्णतेच्या तीव्र झळांमुळे देशभरात १ मार्च ते १८ जूनदरम्यान उष्माघाताने जवळपास ११० जणांचा मृत्यू झाला. तर गत २४ तासांत राजधानी दिल्लीत उष्माघाताच्या १७ बळींची नोंद झाल्याने हा आकडा १२७ वर पोहोचला आहे. इतर राज्यांनी अद्याप अंतिम आकडेवारी दिली नसल्याने बळींचा आकडा याहून अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर जवळपास ४० हजारहून अधिक जणांना उष्माघाताचा सामना करावा लागला आहे .
एकीकडे मान्सूनचे वेळात आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र दुसरीकडे अनेक ठिकाणी अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. राज्यात अशी स्थिती असताना देशभरात अनेक भागातील दिवसेंदिवस तापमान अधिकच वाढत असून उष्णतेची लाट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यातही काही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असल्याचे दिसत आहे. त्यात भारतीय हवामान विभागाने थेट ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तसेच, नागरिकांना काळजी घेण्याचे अवाहनही केले आहे.
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रकडून देशभरातील उष्णतेशी संबंधित आजार व मृत्यूची आकडेवारी जारी करण्यात आली. त्यानुसार तीव्र तापमानाचा सर्वाधिक फटका उत्तरप्रदेशला बसला. उत्तरप्रदेशात उष्माघातामुळे जवळपास ३६ जणांचा मृत्यू झाला आहे .
यापाठोपाठ बिहार, राजस्थान आणि ओडिशात लोक दगावले असून इतर राज्यांनी अद्याप आकडेवारी दिली नाही. त्यामुळे हा आकडा प्रत्यक्षात जास्त असण्याची शक्यता आहे.
वेळेआधी देशात दाखल झालेल्या मान्सूनने अजूनही संपूर्ण देश व्यापलेला नाही. अशा स्थितीत देशातील अनेक भागांत विशेषतः उत्तरेकडील राज्यांमध्ये सूर्याचा प्रकोप अजूनही सुरूच आहे. दिल्लीत गत २४ तासांत १७ जणांचा उष्माघाताने बळी गेला. राम मनोहर लोहिया व सफदरजंग रुग्णालय प्रशासनाने ही आकडेवारी दिली आहे.
या दोन्ही रुग्णालयांत उष्माघाताचे एकूण ५५ रुग्ण दाखल झाले होते. इतर रुग्णालयांतील आकडेवारी विचारात घेतली तर हा आकडा आणखी मोठा होईल. एनसीडीसीच्या आकडेवारीनुसार, १८ जून या एका दिवशी उष्माघातामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. उत्तर आणि पूर्व भारतातील बहुतांश भागांत बऱ्याच काळापासून तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे.
त्यामुळे उष्माघाताचे बळी वाढले असून उष्णतेमुळे अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयात विशेष केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. तापमानाची तीव्रता वाढत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी सर्व राज्यांतील सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित विशेष केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.