Saffron Farming:- भारतामध्ये जर आपण बघितले तर अशी अनेक पिके आहेत की हे विशिष्ट तापमानात आणि देशाच्या विशिष्ट भागामध्येच उत्पादित होतात व त्या ठिकाणी त्यांची लागवड यशस्वी होते. उदाहरणच घ्यायचे झाले तर यामध्ये सफरचंद या फळ पिकाचे उदाहरण आपल्याला घेता येईल.
आपल्याला माहित आहे की, सफरचंद हे थंड प्रदेशात येणारे पीक असल्याने त्यामुळे ते जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केले जाते व उत्पादित देखील होते. परंतु आता जर आपण बघितले तर आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये आल्याने शेतकरी सफरचंदाची लागवड अगदी महाराष्ट्र देखील करू लागले आहेत व इतकेच नाही तर सफरचंदाची लागवड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यशस्वी देखील केली आहे.
यामध्ये नक्कीच प्रगत तंत्रज्ञानाचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसून येतो. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण छत्रपती संभाजी नगर येथील उस्मानपुरा भागात राहणारे निवृत्त कृषी अधिकारी लक्ष्मीकांत अपसिंगेकर आणि त्यांच्या पत्नी मीना अपसींगेकर यांची यशोगाथा बघितली तर या दांपत्याने youtube वर केशर शेती विषयी माहिती घेतली
व चक्क बंगल्यातील नऊ बाय 11 चौरस फूट आकाराच्या खोलीमध्ये केशर लागवड यशस्वी केली आहे. या दांपत्याने कशा पद्धतीने केशर लागवडीचे नियोजन केले? त्याबद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
मराठवाड्यातील निवृत्त कृषी अधिकाऱ्याने केशर लागवड केली यशस्वी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा या भागामध्ये निवृत्त कृषी अधिकारी लक्ष्मीकांत अपसिंगेकर हे राहतात. त्यांनी व त्यांच्या पत्नी मीना अपसिंगेकर यांनी युट्युब वर एकदा केशर शेती विषयी व्हिडिओ पाहिला व त्याविषयी माहिती घेतली. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये केशर लागवडीविषयी कुतूहल जागृत झाले.
या माध्यमातूनच त्यांना पुण्यातील अक्षय मोडक नावाच्या तरुणाने केशर शेतीचा प्रयोग यशस्वी केल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी पुण्याला जाऊन त्यांच्याशी भेट केली व पुण्याला जाऊनच केशर फार्मिंगची ट्रेनिंग देखील घेतली. ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर त्यांनी त्यांच्या बंगल्यातील नऊ बाय 11 चौरस फूट आकाराच्या खोलीमध्ये जम्मू काश्मीर सारखे थंड वातावरण तयार करण्याच्या उद्दिष्टाने खोलीत उपाय योजना केल्या.
याकरिता त्यांनी काश्मीरमधील असलेले सरासरी तापमान व सरासरी आद्रतेचा अभ्यास केला व त्यानुसारच सगळ्या उपाययोजना केल्या. येथील आद्रता 70% राहणे गरजेचे आहे हे आद्रतेचा अभ्यास करताना त्यांना दिसून आले व याकरिता त्यांनी एअरोफोनिक यंत्र व कुलिंग तंत्रज्ञानाची मदत घेऊन खोलीचे तापमान दिवसा 21 अंश सेल्सिअस व रात्रीच्या आठ अंश सेल्सिअस अशाप्रकारे मेंटेन केले.
तसेच केशर पिकाला आवश्यक ते तापमान उपलब्ध व्हावे याकरिता लाइटिंगची देखील व्यवस्था केली. केशर लागवड करण्याकरिता त्यांनी 80 किलो केशर कंद अगोदर विकत आणले व त्यांची लागवड ट्रेमध्ये केली. आज जवळपास साडेतीन महिन्यांनी त्यांना केशरचे उत्पादन मिळायला लागले आहे.
केशरला मिळतो प्रतिकिलो पाच लाख रुपयाचा बाजारभाव
आपल्याला माहित आहे की केशरचे अनेक गुणकारी फायदे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत व संपूर्ण जगामध्ये केसरला खूप मागणी असते. आपल्याला माहित आहे की जम्मू आणि काश्मीरमध्ये केशर शेतीला आवश्यक असे हवामान उपलब्ध आहे. त्यामुळे देशातील जेवढी केशरची मागणी आहे त्या मागणीच्या केवळ 11 टक्केच उत्पादन होते व जवळपास 89% केशरची आयात करावी लागते.
त्यामुळे मागणी जास्त व उत्पादन खूपच कमी असल्यामुळे केशरला सुमारे पाच लाख रुपये प्रति किलोचा दर आहे. अपसिंगेकर यांना साधारणपणे 200 ते 250 ग्रॅम केशर उत्पादन होण्याची शक्यता असून पुढे एक वर्षानंतर केशर फार्मिंग नफ्यात असेल असे त्यांनी म्हटले.
विशेष म्हणजे अपसिंगेकर यांचा हा केशर फार्मिंगचा प्रयोग मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग आहे. भविष्यामध्ये ते आता केशर फार्मिंग लॅब मध्ये केशर कंदाची लागवड करणार आहेत व यातून जे कंद उपलब्ध होतील ते पुढील उत्पादनासाठी त्यांना वापरता येणार आहेत.